Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील कांदळवनावर सीसीटीव्हीची नजर

मुंबईतील कांदळवनावर सीसीटीव्हीची नजर

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता

Related Story

- Advertisement -

कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला.

यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसर्‍या टप्प्यात पश्चिम आणि मध्य मुंबई तर तिसर्‍या टप्प्यात नवी मुंबई, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे.

- Advertisement -

याच बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कांदळवन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच सागरतटीय भागात कांदळवन वृक्षाची लागवड करण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या. कांदळवन प्रतिष्ठानमार्फत विकसित करण्यात येत असलेले निसर्ग क्षेत्रे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि इतर उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पर्यटनाला चालना द्यावी, असेही ते म्हणाले.

वडाळ्यात कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र
एमएमआरडीएने एमटीएचएल प्रकल्पांतर्गत कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यातून भक्ती पार्क, वडाळा येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी निविदेद्वारे काम करण्यासाठी सर्वात कमी दर असलेल्या मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

- Advertisement -

पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गाचा अभ्यास
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीतील स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गाचा अभ्यास करण्याच्या प्रस्तावासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा कालावधी पाच वर्षांचा आहे. यासाठी कांदळवन प्रतिष्ठान आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

कांदळवन प्रतिष्ठानच्या २०२१-२२ साठीच्या ३० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास तसेच कांदळवन प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांसाठीच्या २५ कोटी रुपयांच्या खर्चास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

याबरोबर ऐरोली येथील शोभिवंत मत्स्य उबवणी केंद्रात अधिक तांत्रिक सुधारणा करण्यासाठी एनबीएफजीआरला तीन वर्षांची मुदतवाढ, कोपरी-ठाणे येथे विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक यांच्या कार्यालयाच्या आणि अधिकार्‍यांच्या निवासस्थानाचे बांधकाम करण्यास मान्यता, ऐरोली येथील प्रतिष्ठानच्या कार्यालयात माहिती फलक आणि दिशादर्शक लावणे असे विविध निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आले.

सागरी जीव बचावासाठी वाहन खरेदी
संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या क्षेत्र संचालकांनी दिलेल्या ७ सागरी जीव बचाव वाहन खरेदी आणि यापोटी येणार्‍या १ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही वाहने किनारी भागातील सागरी जीवांच्या जसे की सागरी कासव, डॉल्फिन, इ. च्या बचावासाठी वापरण्यात येतील. डहाणू, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग अशा ठिकाणी ही वाहने कार्यरत राहतील. ही वाहने खरेदी करताना मुंबई आणि ठाण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करावी, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत कांदळवन प्रतिष्ठानने सागरी आणि किनारी जैवविविधतेच्या संवर्धन कार्यात लक्षणीय काम करणार्‍या व्यक्तींना कांदळवन प्रतिष्ठान पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची, कोस्टवाईज उत्सवाच्या आयोजनाची माहिती देण्यात आली. याशिवाय कांदळवन प्रतिष्ठानसमवेत सुरू असलेल्या काही संशोधन प्रकल्पांना मंजुरी, अनुदानित प्रकल्पांना मुदतवाढ यासारखे निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आले.

- Advertisement -