गणेशोत्सवात धोकादायक पुलांचे विध्न, मुंबई महापालिकेची माहिती

mumbai

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात कोरोना संसर्गाचे विघ्न आडवे येत होते. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने श्रीगणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा मुंबईकरांनी संकल्प सोडला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन होणार आहे. तर त्यानंतर दीड, पाच, सात, दहा आणि अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. वास्तविक, ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होते. परंतु यंदाच्या गणेशोत्सवातही मुंबईतील १३ धोकादायक पुलांचे विघ्न आडवे आले आहे. मात्र, गणेश भक्तांना या पुलांवरून गणेश मिरवणूक नेताना अप्रिय घटना टाळण्यासाठी काही बंधने घालण्यात आली असून त्यांचे पालन करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यास राज्य शासन, मुंबई महापालिकेने काहि अटी – शर्तींवर परवानगी दिली आहे. मात्र, गणेशोत्सव साजरा करताना शक्यतो पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्यात यावा. कोरोना नियमांचे व सुरक्षिततेचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केले आहे.

मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने गणेशोत्सव पर्यावरणपूरक व निर्विघ्नपणे साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक माहिती पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या माहिती पुस्तिकेत पालिकेने आदर्श गणेशोत्सवाबाबत चांगली माहिती दिली आहे. त्याचबरोबर मुंबईतील धोकादायक पुलांची यादी दिली असून या पुलांचा गणेशोत्सवात जपून व काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

अंधेरी येथे ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. या गंभीर घटना घडल्यानंतर शासन व पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. धोकादायक पुलांबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने गणेशोत्सवात मुंबईतील १३ धोकादायक पुलांचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जुन्या व धोकादायक पुलांची यादी –

घाटकोपर रेल्वे पूल, (रेल्वे ओव्हर ब्रीज),

करी रोड रेल्वे पूल,

साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड)

चिंचपोकळी रेल्वे पूल

भायखळा रेल्वे पूल

मरीन लाईन्स रेल्वे पूल

सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल

फ्रेंच रेल्वे पूल, केनडी रेल्वे पूल

फॉकलँड रेल्वे पूल

बेलासीस रेल्वे पूल

महालक्ष्मी स्टील रेल्वे पूल

प्रभादेवी-कॅरोल रेल्वे पूल

दादर – टिळक रेल्वे पूल