घरमुंबईउदानी हत्याकांड बोलविता धनी तिसराच?

उदानी हत्याकांड बोलविता धनी तिसराच?

Subscribe

व्यावसायिक उडानी हत्या प्रकरण

घाटकोपर येथील सोने-चांदीचे व्यापारी राजेश्वर उदानी यांची हत्या होऊन दोन आठवडे उलटले तरी या हत्येचा मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दिवसेंदिवस या हत्येची गुंतागुंत वाढत असून सचिन पवार आणि निलंबित पोलीस हवालदार दिनेश पवार हे पोलिसांना सांगत असलेली थिअरी पचनी पडत नाही. त्यातच उदानी यांच्या मृतदेहाची डीएनए टेस्ट बाकी आहे. त्यामुळे उदानी यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेले नाहीत. येत्या काही दिवसात उदानी यांच्या कुटुंबियांकडून हत्याकांडाबद्दल माहिती घेण्यात येणार असल्याने या प्रकरणात बोलविता धनी तिसराच तर नाही ना? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येला आठवडा उलटून गेला तरी या हत्येची कडी काही केल्या जुळत नसल्यामुळे या गुन्ह्याची गुंतागुंत आणखीनच वाढतच चालली आहे. पोलीस अद्यापही उदानी यांच्या हत्येचे मुख्य कारण शोधू शकलेली नसून या हत्येमागे अजून कुणाचे डोके असू शकते का ? किंवा या हत्येमागचा बोलवता धनी उदानी यांच्या जवळची व्यक्ती आहे का? हे देखील पोलीस पडताळून बघत आहे.

- Advertisement -

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहेत. आतापर्यंत पंतनगर पोलिसांनी दोन महिलांसह ७ जणांना अटक केली आहे. या हत्येचे षड्यंत्र रचणारे सचिन पवार आणि दिनेश पवार हे दोघे असले तरी त्यांचा देखील बोलवता धनी तिसराच कोणी तरी असावा अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

घाटकोपर पूर्व येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक सचिन पवार, निलंबित पोलीस शिपाई दिनेश पवार,बारगर्ल शाईस्ता खान उर्फ डॉली, निखत खान उर्फ झारा, प्रणीत भोईर, महेश भोईर, आणि सिद्धेश पाटील या सातजणांना आतापर्यंत अटक केली आहे. उदानी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून निखत खान हिच्यासोबत त्यांचा व्हिडीओ काढून उदानी यांच्याकडून पैसे उकडळण्याचा कट होता.

- Advertisement -

मात्र, त्यांना या कटाचा सुगावा लागल्यामुळे त्यांनी वाटेतच गोंधळ घातल्याने त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे अटक आरोपी सचिन आणि दिनेश यांनी पोलीस जबाबात सांगितले. त्यांनी दिलेला जबाब हा पोलिसांच्या पचनी पडत नसून उदानी यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासवरून उघड होत आहे. हत्येचा कट हा एक महिन्यापासून सचिन आणि दिनेश यांच्यात शिजत होता. उदानी यांना हनीट्रॅपमध्ये अडकून त्यांची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी टाकण्याचा कट आखण्यात आला होता. उदानी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी शाईस्ता खान उर्फ डॉलीमार्फत निखत खान हिला या कटात सामील करण्यात आले होते. त्यासाठी शाईस्ता खान आणि निखत यांना पाच लाख रुपये देण्याचे कबूल करण्यात आले होते.

उदानी यांच्या हत्येसाठी रचलेला पूर्वनियोजित कट होता, त्यासाठी सचिनने एका मित्राची आय टेन ही मोटार देखील घेतली होती. तसेच त्या मोटारीचा खरा नंबर लपवण्यासाठी बनावट नंबर प्लेट देखील बनवण्यात आली होती हे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. सचिन आणि दिनेशला या हत्येसाठी सुपारी देण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही हत्या नक्की कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली? या मागचा बोलवता धनी नक्की कोण आहे? या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू असल्याचे समजते.

दिनेशने निखतसोबत रात्र काढली
उदानी यांची हत्या करून मृतदेह पनवेल येथील नेरवाडीच्या जंगलात टाकण्यात आल्यानंतर दिनेश हा निखत खान हिला घेऊन मुरुड येथे गेला. मुरुड येथे एक रात्र काढल्यानंतर दोघे दुसर्‍या दिवशी सायंकाळी मुंबईत आले. त्यानंतर दिनेशने निखतला लोखंडवाला येथे सोडून तो वसई येथे एका मैत्रिणीकडे निघून गेला होता.

दिनेशच्या व्यायामशाळेत मिळाले दागिने
हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांना दागिने घालण्याचा शौक होता. त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने तसेच हिरेजडित अंगठ्या,महागडे घड्याळ नेहमी असायचे. ज्या दिवशी उदानी यांची हत्या झाली त्या दिवशी ही त्यांच्या गळ्यात सोन्याच्या लॉकेटसह सोन्याची चैन, हिरेजडित अंगठी आणि रोकड होती. पनवेल तालुका पोलिसांना नरेवाडी जंगलात उदानी यांचा मृतदेह सापडला. एकही दागिना अथवा रोकड मिळालेली नाही. हे सर्व दागिने दिनेश पवार याच्याकडे सापडले. पंतनगर पोलिसांनी दिनेश पवार याच्या घाटकोपर येथील व्यायाम शाळेतून उदानी यांचे सर्व दागिने हस्तगत केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -