घरमुंबईपोलीस पुत्र अथर्व शिंदेंच्या मृत्यूचं गूढ उलगडणार

पोलीस पुत्र अथर्व शिंदेंच्या मृत्यूचं गूढ उलगडणार

Subscribe

वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अथर्वचं रॅगिंग करण्यात आलं असावं, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असावेत, असं अथर्वच्या वडिलांनी पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

गोरेगाव आरे कॉलनीतील रॉयल पाम येथे  ७ महिन्यांपूर्वी अर्थव शिंदे (२१) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती आलेल्या पुराव्यावरून जवळजवळ निष्पन झाले होते. मात्र, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे काही अहवाल अद्याप यायचे बाकी असल्यामुळे सध्या काही  बोलता येणार नाही, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. अथर्व त्याच्या एका मैत्रीणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी घराबाहेर पडला आणि घरी परतलाच नाही. बेपत्ता असलेला अथर्व ९ मे रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास आरे कॉलनीतील रॉयल पाम तळ्याजवळ मृतावस्थेत सापडला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा असल्यामुळे अथर्वची हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. अथर्वचे वडिल नरेंद्र शिंदे आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक असून त्यांच्या तक्रारीवरून आरे पोलिसांनी अज्ञात इस्माविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

घटना सविस्तर… 

अथर्व शिंदे हा सात मेच्या रात्री वाढदिवसाच्या पार्टीसाठी म्हणून घराबाहेर पडला होता. तो ज्या मुलीच्या बर्थडे पार्टीला गेला होता तिचे वडिल मराठी चित्रपटांचे निर्माते आहेत. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्या मित्र-मैत्रिणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यांच्या चौकशीनंतर आणि घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यावरून अथर्वची हत्या झाली की त्याचा अपघाती मृत्यू झाला, या याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अथर्वने अंमली पदार्थांचे सेवन केले होते, हे तपासात आणि वैधकीय अहवालात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी त्यावेळी अमली पदार्थ विकणाऱ्या अनेकजण अटक केली होती, मात्र त्यातही अथर्वची हत्या झाल्याचे ठोस पुरावे मिळाले नाहीत.

- Advertisement -

पार्टीत ड्रग्सची रेलचेल

आरे कॉलनीतल्या रॉयल पाल्मस येथील बंगला नंबर २१२ मध्ये अथर्व पार्टीसाठी गेला होता. या पार्टीत मद्य आणि ड्रग्सची रेलचेल होती. पार्टीच्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावर अथर्वचा मृतदेह सापडला. आरे पोलिसांकडून अथर्व मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु होता, मात्र त्यातून काहीही निष्कर्ष काढण्यात पोलिसांना यश आलं नाही. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्याची मागणी केली होती. शिंदे कुटुंबीयांनी राज्याचे पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांना तसं पत्रही  पाठवलं होतं. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अथर्वचं रॅगिंग करण्यात आलं असावं, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असावेत, असं अथर्वच्या वडिलांनी पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

गूढ लवकरच उलगडणार…

दरम्यान, तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी हा तपास गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष ११ कडे सोपवण्यात आला होता.
गुन्हे शाखेने या गुन्हाचा तपास सुरुवातीपासून सुरू केला, गुन्हे शाखेला मिळून आलेले पुरावे, साक्षिदार, वैधकीय अहवाल या हाती आलेल्या  पुराव्यावरून अथर्व याची हत्या नसून अपघातच असल्याचे जवळजवळ निष्पन्न झाले आहे मात्र गुन्हे शाखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या नमुन्यांच्या अहवालाची वाट पहात आहे. हे अहवाल हाती आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल अशी शक्यता पोलीस अधिकारी वर्तवत आहे.
.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -