घरमुंबईमाझेही मत ...

माझेही मत …

Subscribe

स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडावा
निवडणुकांमध्ये सर्रासपणे दिसणारे जातीधर्माच्या राजकारणाचे उच्चाटन व्हावे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा नागरिक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडून देतील. यासाठी नागरिकांनी मतदारसंघातील उमेदवारांचे शिक्षण, कामाचा अनुभव, सामाजिक प्रश्नांची जाण या गोष्टी माहित करून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निवडून आलेल्या उमेदवाराने निवडणुकीनंतर जनमताचा आदर राखत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे मतदाराने मतदानाकडे पाठ न फिरवता देशहिताचा विचार करून, नागरिक म्हणून मतदानाचा अधिकार चोखपणे बजावावा.  -संतोष आंब्रे, प्रशिक्षक

कृषिक्षेत्रात सुधारणा गरजेची
मागील काही वर्षात देशाचा आर्थिक विकास रखडला आहे. आज देशातील शेतकरी, कृषी क्षेत्र मरणासन्न अवस्थेत आहे. देशातील बहुतेक भागात आज दुष्काळसदृश परिस्थिती आहे. दुष्काळाशी दोन हात करताना शेतकर्‍याला शेतीशिवाय पर्यायी उपजीविकेचे साधन शोधणे कठीण झाले आहे. तेव्हा शेतकरी, आणि कृषी क्षेत्राला या संकटातून बाहेर काढण्यासाठी कृषिक्षेत्रात सुधारणा करण्याची जबाबदारी येणार्‍या सरकारची असेल. रोजगाराच्या बाबतीतही देशात सारखीच परिस्थिती आढळते. चुकीच्या आर्थिक धोरणांचा फटका लघु उद्द्योगांना बसल्याने लघुउद्योजकांसह कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे लघु उद्द्योगांसह नोकर्‍यांच्या उपलब्धतेबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आव्हान येणार्‍या सरकारपुढे असेल. -चित्रा सावंत, मुक्त पत्रकार

- Advertisement -

सक्षम राजकीय नेतृत्वाची निवड व्हावी
माझ्या मते लोकसभेच्या निवडणुकीत नागरिकांनी व्यापक देशहिताचा विचार करून राष्ट्रीय पक्षातील सक्षम राजकीय नेतृत्वगुण असलेल्या उमेदवाराची निवड करावी. मतदारसंघातील प्रश्न तसेच देशपातळीवरील इतर प्रश्नांना सक्षमपणे मांडण्याची हातोटी असलेले उमेदवार आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रगतीस कारणीभूत ठरतो. तेव्हा उमेदवाराची केवळ शैक्षणिक, आर्थिक प्रगती न बघता सक्षम राजकीय नेतृत्वगुण असलेल्या उमेदवाराला जनतेने निवडून द्यावे. तसेच निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तसेच विरोधकांच्या मागील ५ वर्षाच्या कालावधीचे मतदाराने मूल्यांकन करावे असे मला वाटते.
-गणेश गावडे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -