घरमुंबईड्रग्ज प्रकरणी इक्बाल कासकरची एनसीबीकडून चौकशी

ड्रग्ज प्रकरणी इक्बाल कासकरची एनसीबीकडून चौकशी

Subscribe

पोलीस बंदोबस्तात आणले कार्यालयात

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताबा घेऊन त्याची कसून चौकशी केली. ठाण्यातून त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. दोन दिवस चौकशी केल्यानंतर इक्बालला पुन्हा ठाणे कारागृहात नेण्यात येईल असे सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात एनसीबीच्या एका विशेष पथकाने भिवंडीतील अर्जुन टोल प्लाझा परिसरात कारवाई करून शब्बीर उस्मान शेख आणि अहमद लाझा या दोघांना ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी बारा किलो चरसचा साठा जप्त केला होता. याच गुन्ह्यांत या दोघांनाही नंतर एनसीबीने अटक केली होती. चौकशीत जप्त केलेला चरसचा साठा जम्मू-काश्मीर येथून आणण्यात आला होता.

- Advertisement -

या दोघांनी ते दोघेही इकबाल कासकरसाठी काम करीत असल्याची कबुली देताना या चरसची माहिती त्याला देण्यात आल्याचे सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी शब्बीरने ड्रग्जचा साठा इक्बाल कासकर याला दिला होता, त्यामुळे इक्बालच्या चौकशीसाठी एनसीबीने पत्रव्यवहार केला होता. इक्बाल हा सध्या ठाणे जेलमध्ये आहे. त्याच्याविरुद्ध खंडणीचा एक गुन्हा दाखल असून याच गुन्ह्यात तो सध्या तिथे न्यायालयीन कोठडीत होता. शुक्रवारी सकाळी एनसीबीच्या पथकाला इक्बालचा ताबा मिळाला होता. त्यानंतर त्याला भिवंडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची ट्रॉन्झिट प्रोडेक्शन वॉरंटवर जारी केले होते.

कोर्टाकडून परवानगी मिळताच त्याला पोलीस बंदोबस्तात ठाण्यातून एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. तिथेच इक्बालची शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याला पुन्हा ठाणे जेलमध्ये पाठविण्यात येणार आहे. इक्बालच्या चौकशीसाठी एनसीबीने एक प्रश्नावली तयार केली आहे. सायंकाळी त्याची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, त्याचा तपशील समजू शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -