घरमुंबईराष्ट्रवादीची तिजोरी रिकामी 

राष्ट्रवादीची तिजोरी रिकामी 

Subscribe

१९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे सलग सत्ता उपभोगणार्‍या आणि पक्ष स्थापनेच्या दोन दशकातच राष्ट्रवादी काँग्रेसला पैशांची मोठी चणचण भासू लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:हून त्याची कबुली देताना राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट झाल्याचे बोलून दाखवले.

१९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे सलग सत्ता उपभोगणार्‍या आणि पक्ष स्थापनेच्या दोन दशकातच राष्ट्रवादी काँग्रेसला पैशांची मोठी चणचण भासू लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:हून त्याची कबुली देताना राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट झाल्याचे बोलून दाखवले. मंगळवारी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत पवार यांनी भाजपकडे भरपूर पैसे आहेत; पण आपल्या पक्षाची तशी अवस्था नाही. आगामी निवडणुकीत तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यापूर्वी केलेली कामे, माऊथ पब्लिसिटी आणि सोशल मीडियाद्वारे प्रचार करा असे आदेशच कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे बैठकीसाठी आलेल्या सर्व नेत्यांच्या आणि पदाधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या.

निवडणुका म्हटल्या की पैसा आणि पैशाची होणारी उधळपट्टी आपणा सगळ्यांना माहीत आहेच. नुसती आमदारकी जरी लढवायची असेल तर करोडो रुपयांचा चुराडा होतो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात न राहिलेला हा निवडणूक खर्च आता मोठ्या पक्षांचा चिंतेचा विषय ठरला आहे. काँग्रेससोबत इतकी वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला होणार्‍या खर्चामुळे चिंता वाढली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १५ वर्ष मंत्री राहिलेले अनेक दिग्गज आमदार आणि विद्यमान नेतेही पक्षाला निधी देत नाहीत. आपापली प्रॉपर्टी वाढवण्यात धन्यता मानणारे अनेक नेते अजूनही पक्षात महत्त्वाच्या पदांवर बसून असल्याची खंत राष्ट्रवादीच्या एका तरूण कार्यकर्त्याने आपलं महानगरशी बोलून दाखवली. केवळ पवार घराण्याशी संबंधित काही मोजके व्यावसायिकच पक्षाच्या मागे  उभे असल्याचेही तो म्हणाला.

- Advertisement -

सत्तेविना पैसा येणे कठीण 

१९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून प्राथमिक सदस्य आणि कार्यरत सदस्य अशा फीच्या माध्यमातून पैसा जमा केला जातो. प्राथमिक सदस्याकडून ३ वर्षासाठी ५ रूपये नाममात्र सदस्य फी घेतली जाते. मागील ३ वर्षांत १४ लाख कार्यकर्त्यांनी सदसत्व घेतली असून त्यापोटी पक्षाच्या तिजोरीत ७० लाख रूपये जमा झाले आहेत. सत्तेत असताना पक्षावर प्रेम करणारे आश्रयदाते असतात. त्यांच्या माध्यमातून तिजोरीत पैसे जमा होत असतात. शरद पवार यांच्यासारखा समाजाच्या सर्व बाजूंचा विचार करणारा नेता पक्षात असल्याने त्याचाही फायदा आतापर्यंत झाला आहे. याशिवाय विधान परिषद आमदार तसेच राज्यसभा खासदार यांना वर्षाला मिळणार्‍या विकास निधीपैकी निम्मा निधी हा पक्षाने ठरवलेल्या मतदारसंघाच्या विकासकामांवर खर्च केला जातो. याशिवाय निवडणुकीला उभे राहणार्‍या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात खर्च करण्याच्या सूचनाही पक्षाकडून दिल्या जातात. माध्यमांमधील पक्षाचा प्रचार, प्रसार याचबरोबर झेंडे, बॅनर, होर्डिंग्ज यासाठी काही रक्कम पक्ष खर्च करत असतो. याचबरोबर विधीमंडळ पक्ष कार्यालय तसेच मुख्य पक्ष कार्यालय यासाठी प्रत्येक आमदाराकडून प्रत्येकी ८ हजार रुपये घेतले जातात. नरिमन पॉईंटच्या पक्ष कार्यालयाचे नूतनीकरण कुणालाही न कळता माजी उपमुख्यमंत्री, नेते अजित पवार यांनी केले होते. असा खर्च करणारे अन्यही नेते आहेत. ते आपल्या मतदारसंघाबरोबर पक्षाचीही काळजी घेतात. छगन भुजबळ यांचाही पक्षाला मोठा आधार होता.

कार्यालयीन खर्चही परवडण्याबाहेर…

राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा खर्चही आता परवडणारा राहिलेला नाही. नरिमन पॉईंट येथे कार्यालय असताना येणारा खर्च बेलार्डपियर येथे आल्यावर वाढला आहे. हा खर्च भागवण्यासाठी पूर्वी पक्षाकडून निधी मिळायचा. सदस्य फीचा वापरही करता येत हेाता. आता निधी मिळणे अवघड बनल्याने बँकेतील ठेवींचा वापर करावा लागत आहे. महिन्याकाठी कार्यालयाचा खर्च पाच लाखांचा आहे. कार्यालयातील कर्मचार्‍यांची संख्या १५ इतकी आहे. या कर्मचार्‍यांच्या वेतनापासून इतर खर्चाची तजवीज करणे अत्यंत अवघड बनले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी दृष्टीक्षेपात…

मागील ३ वर्षात १४ लाख सदस्य
३ वर्षासाठी नाममात्र ५ रूपये फी
माजी मंत्री, नेतेही पक्षाला निधी देईनात
मुदत ठेवीतून होतो कार्यालयीन पगार

भाजपकडे पैसा, आपल्याकडे केलेली कामे
भाजपाकडे पैसे आहेत. पण आपली सध्या तशी परिस्थिती नाही. त्यामुळे भाजपा पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकू शकते. त्यामुळे जो कालावधी आहे त्यात आपण यापूर्वी केलेल्या कामाच्या जोरावर, माऊथ पब्लिसिटीने आणि सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहचू शकतो.
– शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खोटे 
राष्ट्रवादीवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे होते हे तिजोरीतील खडखडाटावरून आता सिद्ध झाले आहे. सलग १५ वर्षे सत्तेत असल्याने प्रचंड माया जमवण्यात आली, असे आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर आरोप सातत्याने झाले. आरोपांप्रमाणे कोट्यवधी रुपये असते तर गेल्या ४ वर्षात तिजोरीत खडखडाट होण्याएवढी आमची परिस्थिती झाली नसती. पक्षाकडे आलेला पैसा हा विकासकामांसाठीच वापरला गेला, तो पक्षाच्या तिजोरीत गेेला नाही. 
– भास्कर जाधव, माजी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी 

पवारसाहेब वास्तवाचा विचार करतात
भाजप ज्या गतीने आक्रमक प्रचार करत आहे, तो पाहता इतर पक्षांना तसा प्रचार करणे शक्य नाही. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया, होर्डिंग्ज येथे प्रचार करण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. तो पैसा भाजप वगळता इतरांकडे दिसत नाही. परिणामी सोशल मीडिया आणि थेट लोकांमध्ये जाऊन प्रचार करणे तसेच माऊथ पब्लिसिटी करणे एवढेच आता राष्ट्रवादीच्या हाती आहे. यामुळेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे बोलले असावेत आणि ते वास्तवाचा विचार करता खरे आहे. 
– नवाब मलिक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -