मनसुख हिरेनच्या हत्येचा मुख्य सूत्रधार प्रदीप शर्मा, एनआयएचा मोठा दावा

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटले की, या प्रकरणातील इतर आरोपींसह शर्मा यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात अनेक बैठका घेतल्या. या ठिकाणी कट रचला गेला. बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी शर्मा यांना 45 लाख रुपये दिले होते.

pradeep sharma arrested

ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याच्या मोठ्या कटात मनसुख हिरेन हा एक कमकुवत दुवा असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटले की, या प्रकरणातील इतर आरोपींसह शर्मा यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात अनेक बैठका घेतल्या. या ठिकाणी कट रचला गेला. बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी शर्मा यांना 45 लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी हिरेनची हत्या करणाऱ्या व्यक्तीला दिली होती.  शर्मा निर्दोष नाहीत. त्यांनी कट, खून आणि दहशतवादी कृत्य केले आहे. जमा केलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की प्रदीप शर्मा या गुन्ह्यात सक्रियपणे सहभागी होते. त्यांनी कट रचणे, दहशतवादी कृत्य, दहशतवादी टोळीचे सदस्य, अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करणे असे गुन्हे केले आहेत. अँटिलियाबाहेर घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हिरेनची हत्या करण्यात आली, असेही एनएआयएने म्हटले आहे.

अंबानींच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याच्या टोळीचे प्रदीप शर्मा सक्रिय सदस्य होते. मनसुख हिरेन हा कटातील कमकुवत दुवा होता. त्यामुळे शर्मा यांनी त्याची हत्या केली. मनसुख हिरेनला या संपूर्ण कटाची आणि आरोपींची माहिती होती. तो सत्य उघड करेल या भीतीने त्याची हत्या करण्यात आली, असा दावा एनआयएने केला आहे. न्यायमूर्ती ए.एस.चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या खंडपीठाने याचिकेवर पुढील सुनावणीसाठी १७ मार्चला ठेवली आहे.

दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ 25 फेब्रुवारी 2021 रोजी सापडली होती.  ही गाडी मनसुख हिरेन यांची होती. त्यानंतर  ५ मार्च २०२१ रोजी ठाण्याजवळ एका खाडीत  हिरेन मृतावस्थेत सापडले होते.  शर्मा यांना एनआयएने 17 जून 2021 रोजी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.