घरमुंबई"मुघलांचा पुळका असेल तर चालते व्हा पाकिस्तानला..." निलेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका

“मुघलांचा पुळका असेल तर चालते व्हा पाकिस्तानला…” निलेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका

Subscribe

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर बाजूंनी टीका करण्यात येत आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलेली असतानाच आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आव्हाडांना पाकिस्तानला चालते व्हा.. असे ट्विटरच्या माध्यमातून सुनावले आहे.

राज्यातील नेत्यांकडून महापुरुषांबाबत वारंवार वक्तव्ये केली जात आहेत. आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नव्याने एक वक्तव्य केले आहे. “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत,” असे वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री डॉ. आव्हाड यांनी केले आहे.  ज्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ट्वीट केले होते. ज्यामुळे आव्हाडांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध होऊ लागला.

आव्हाडांनी रवींद्र चव्हाणांच्या या ट्वीटला प्रत्युत्तर देत म्हटले की, “हे सगळे समजायला अक्कल लागते… औरंगजेब, अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य, चलाखी, युद्धनीती कशी समजावणार? .. जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही .. झाकली मूठ सव्वालाखाची..”

- Advertisement -

या वादात उडी घेत, भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. “जितेंद्र अव्हाड, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलणार असाल तर ते सहन केलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा, मुंब्र्यातून निवडून येण्यासाठी तुम्ही हिंदू धर्म विकला आहे, हे आम्हाला माहीत आहे, मुघलांचा पुळका असेल तर चालते व्हा पाकिस्तानला… असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

- Advertisement -

निलेश राणे यांनी याआधी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या अनेक वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. ते कायमच ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर टीका करत असतात. त्यामुळे आता निलेश राणे यांच्या या ट्वीटला जितेंद्र आव्हाड हे नेमके काय उत्तर देतात? तसेच हे ट्विटर वॉर नेमके किती काळ सुरू राहणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. जितेंद्र आव्हाड यांना मुघलांविषयी अधिकच प्रेम आहे, अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर देखील येऊ लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -