घरमुंबईआधारकार्ड नसल्याने वृद्ध महिलेला एसटीमधून उतरवले

आधारकार्ड नसल्याने वृद्ध महिलेला एसटीमधून उतरवले

Subscribe

महामंडळाच्या कर्मचार्‍यांकडून परस्पर ‘आधार’सक्ती

ज्येष्ठ नागरिकत्वाचा पुरावा असूनही आधारकार्डच दाखवा, असा आग्रह धरत राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकाने एका ज्येष्ठ महिला प्रवाशाला एसटीतून खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकीकडे परिवहन मंत्री हे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सोईसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे महामंडळाच्या कर्मचार्‍यांकडून मात्र ज्येष्ठांचा अवमान होत आहे. विशेष म्हणजे कालच सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्ड सक्ती न करण्याचा आदेश दिला असताना महामंडळाकडून मात्र आधारसक्ती केली जात आहे.

केशरबेन धरोड (वय 75) असे या वृद्ध महिला प्रवाशाचे नाव असून त्या 20 सप्टेंबर रोजी सून शिल्पा चेतन धरोड हिच्यासोबत अहमदनगरहून कल्याणला येत होत्या. एमएचबीटी – १३९५ या क्रमांकाच्या एसटीतून त्या प्रवास करत होत्या. तिकीट काढताना शिल्पा यांनी एक पूर्ण व एक अर्धे तिकीट बसवाहक एस.आर. गायकवाड यांच्याकडे मागितले. त्यावर गायकवाड यांनी त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकत्वाचा पुरावा मागितला. शिल्पाने महाराष्ट्र सरकारने दिलेले ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड दाखविले, मात्र हे ग्राह्य धरले जात नाही. पॅनकार्ड किंवा आधारकार्ड दाखवण्याची मागणी केली, पण केशरबेन यांच्याकडे आधार आणि पॅनकार्ड नव्हते. तेव्हा शिल्पाने वाहन चालकांना विनंती केली की आम्हाला थोडा वेळ द्या? मी घराकडे फोन करून मोबाईलवर आधारकार्ड किंवा पॅनकार्डची फोटो मागवून घेते. परंतु, बसवाहकाने नकार दिला. केशरबेन यांची तब्येत नाजूक असल्यामुळे त्या बसमधून उतरायला तयार नव्हत्या. तरीही बसवाहकाने बस रस्त्यामध्येच थांबवून जोवर तुम्ही खाली उतरणार नाही, तोवर बस पुढे नेणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली. बस बराचवेळ थांबल्याने अन्य प्रवाशांनी आरडाओरडा केला. अखेरी बसवाहकाने त्या दोघींना दमदाटी करत अहमदनगरनंतरच्या तारकपूर बस थांब्यावर उतरवले.

- Advertisement -

बसमधून उतरताना शिल्पा हिने बसवाहक गायकवाड यांच्याकडे त्यांचा बॅच क्रमांक विचारला असता त्यांनी तो देण्यास नकार दिला. तसेच गायकवाड यांनी छातीला बॅचही लावला नव्हता. त्यामुळे त्यांना त्यांचा क्रमांक मिळाला नाही. शिल्पाने तारकपूर येथे उतरून दुसरी एसटी बस पकडून कल्याणला आल्या. या बसमधील बसवाहकाने ज्येष्ठ नागरिकांच्या कार्डवरच केशरबेन यांना अर्धे तिकीट दिले. त्यामुळे एक बसवाहक अर्धे तिकीटासाठी आधारकार्ड सक्तीचे असल्याचे सांगतो, तर दुसरा बसवाहक ज्येष्ठ नागरिकाच्या कार्डावरच अर्धे तिकीट देतो. त्यामुळे एसटीच्या नियमांबाबत परिवहन मंत्र्यांनी शिकवणी घेणे गरजेचे बनले आहे. अन्यथा ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवूनही एसटीबाबत प्रवाशांच्या मनात मनस्ताप वाढत राहील. वाहकाच्या या आडमुठेपणाविरुद्ध शिल्पा यांनी ठाणे परिवहन विभागात तक्रार केली.

अहमदनगरहून कल्याण येथे येत असताना मला आलेला अनुभव अन्य कोणालाही येऊ नये. माझ्याबरोबर सून असल्याने मला फारसा त्रास झाला नाही. पण जे वृद्ध एकटे प्रवास करतात त्यांच्याबाबत अशी घटना घडल्यास त्यांना फारच मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अशा कर्मचार्‍यांना धडा शिकवावा.
– केशरबेन धरोड, वृद्ध महिला

- Advertisement -

आईसोबत घडलेल्या घटनेची तक्रार मी ठाणे परिवहन विभागात केली आहे. परिवहन मंत्र्यांनी यात लक्ष घालून तत्काळ कंडक्टरविरोधात कारवाई केली पाहिजे. जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल.
– चेतन धरोड, केशरबेनचा मुलगा

वाहकाची तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करून तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करू.-विजय गीत, विभागीय नियंत्रक,अहमदनगर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -