घरमनोरंजनविश्वासाच्या सुईत प्रयत्नांचा धागा

विश्वासाच्या सुईत प्रयत्नांचा धागा

Subscribe

 

अनुष्का-वरुण या पडद्यावरच्या अती सर्वसामान्य नवरा बायकोनं प्रेमाच्या सुईत हा नात्यांचा धागा अलगद ओवला आहे. कथा, पटकथा, संवाद, अभिनय, सादरीकरण अशा सर्वच आघाड्यांवर सुई धागा उत्तम जमून आलाय. चित्रपटाच्या प्रसंगातलं संतुलन कौतुक करण्यासारखं आहे. नात्यांची वीण घट्ट असली की जगण्याचं कापड परिस्थितीने कितीही ताणलं तरी फाटत नाही. नवरा बायकोच्या नात्याची ही वीण पाहायला सुई धागा पहायला हवा.

- Advertisement -

अतीसामान्य संयुक्त कुटुंबातल्या कनिष्ठ मध्यमवर्गातल्या सर्वसामान्य पती पत्नीच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठीचा केलेला संघर्ष हे सुई धागा चं मुख्य कथानक. परिश्रम करून घर चालवणार्‍या नवरा बायकोच्या कुटुंबातलं कथानक असलं तरीही सुई धागा उपदेश देणारा सिनेमा झालेला नाही. प्रसंग डोळ्यासमोर घडत जातात. त्यातील सातत्य आणि पटकथा आणि संवादावरची पकड दिग्दर्शकाने कुठेही ढीली पडू दिलेली नाही. कथेतील प्रसंग इतके अविश्वसनीय असतात पण ते सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतात. वरुण आणि अनुष्काचं मोठं स्टारडम पडद्यावर घडणार्‍या प्रसंगात कुठेही आड येत नाही. हे या दोघांच्या सहज अभिनयाचं वैशिष्ठ्य आहे. अशा पद्धतीचा वरुण कमालीच्या ताकदीचा अभिनेता आहेच. पण केवळ चकाकत्या स्वित्झर्लंडच्या लव्हस्टोरीतून बाहेर पडलेली अनुष्काही बाजी मारून जाते. पती पत्नीतल्या नात्यातला विश्वास आणि एकमेकांना दिलेला आधार हे कथासूत्र आहे. कितीही अडचणी आल्या तरी…बाकी सब बढीया है…ही सामान्यांच्या जगण्यातली सकारात्मकता आणि आलेल्या अनुचित, अवघड प्रसंगाला तोंड देऊन पुढे जाण्याची इच्छा सर्वसमान्यांच्या जगण्यात रोजचा आनंद पेरून जाते. हा आनंदाचे दोन तास म्हणजे सुई धागा.

चित्रपट विनोदी अंगानं पुढे सरकतो. हतबलता ज्यावेळी हाताबाहेर जाते त्यावेळी समान्य माणूस त्यावर हसतो…हे हसणं जरी उभारी देणारं असतं तरी त्याला कारुण्याची एक किनार असते. चित्रपटाच्या पडद्याला हीच किनार आहे. छोटे मोठे कपडे शिवणार्‍या आणि एका शिलाई मशीनच्या दुकानात काम करणार्‍या मौजी (वरुण धवन) आणि ममता (अनुष्का शर्मा) या नवराबायकोची ही कथा. मौजी आपल्या रोजच्या पोटापाण्याच्या आणि कुटुंबाच्या गरजांनी त्रासलेला आहे. त्यामुळे तो या शिलाई मशीनच्या दुकानात मानअपमान सहन करत कसंबसं जगतो आहे. इथं स्वाभिमान नावालाही नाही तर रोजची गरज आहे. आता स्वाभिमान मिळवायचा तर पैसा हवा. पैसा हवा तर जगण्यातला संघर्ष आणि जोखिम पत्करायला हवी. पण सगळं आयुष्यच तडजोडीत आणि जगाला घाबरून राहाण्यात घालवलेले याचे वडील (रघुवीर यादव) यांना स्वाभिमानापेक्षा जगणं महत्वाचं वाटतं. हे जगणं म्हणजेच जगाने आपल्यावर केलेले उपकार आहेत. अशी पिचलेली सर्वसामान्य माणसाची हतबलता त्यात आहे. आता स्वाभिमानाचा हा संघर्ष कसा होतो. किती टिकतो..याचं उत्तर सुई धागा च्या पडद्यावर पाहायला हवं.

- Advertisement -

रघुवीर यादव आणि वरुण धवन या दोन्ही व्यक्तीरेखांनी पडद्यावर दोन पिढ्यांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. गरीबी आणि संघर्ष ही संधी असते असं मुलाचं मत पडतं. आणि जगण्याच्या विवंचनेत बापाचं आयुष्य जातं. मात्र हे दोन्ही कथानकाचे प्रवाह एकाच वेळेस समांतर ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आलंय. रघुवीर यादवच्या अभिनयाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही. कौतूक अनुष्काचं व्हायला हवं. यशराजच्या याआधीच्या श्रीमंती थाटाच्या सिनेमातही अनुष्का झळकली होती. पण तिच्या अभिनयातील अनेक पैलूंना सुई धागामध्ये उत्तम स्पेस मिळाली आहे. इतरांचे महागडे कपडे शिवणार्‍या नवर्‍याची अडीचशे तिनशे रुपयांच्या साडीत साडीत वावरणारी अनुष्का पडद्यावर भाव खाऊन जाते. वरुण धवनलाही ही मोठी संधी होती. त्यानं तिचं सोनं केलंय. अतीसामान्य माणसाचं निरागस सोसलेपण त्याने करुण डोळ्यांतून आणि अभिनयातून उत्तमपणे साकारलं आहे. हतबल परिस्थितीशी केलेला या दोघांचा हा झगडा पडद्यावर पहायला हवा. कौटुंबिक आणि इतर सग्या सोयर्‍यांच्या नात्यांमधला आर्थिक अप्पलपोटेपणा आणि भावनिक गुंतागुंतही पटकथा, संवादातून उलगडत जाते. एक धागा सुखाचा…शंभर धागे दुःखाचे…एवढं बोलून हा सुई धागा थांबत नाही. या शंभर धाग्यांना जोडून अथक प्रयत्नांचे विणलेले एक स्पप्नपूर्तीचं जरतारी कापड समोर आल्यावर त्याचा परिणाम प्रेक्षकांना सुखावून जातो.

कथानकाला साजेशा असलेल्या घर, रस्ता आणि ठिकाणची दिग्दर्शकाने केलेली लोकेशन्सची निवड उत्तम जमून आलीय. प्रसंग थेट आहेत. संवाद साधे, सरळ आहेत. परिस्थिती, हतबलताआणि संघर्ष असतानाही चित्रपट संवाद उपदेशपर नाहीत. दिग्दर्शक शरत कटारियाने ते शिताफीनं टाळलं आहे. सुई धागानं यशराज फिल्म्सच्या उत्तमोत्तम सिनेमांची परंपरा पुढे नेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -