घरमुंबईसोशल मीडियाचा अतिरेक ठरतोय डॉक्टरांची डोकेदुखी

सोशल मीडियाचा अतिरेक ठरतोय डॉक्टरांची डोकेदुखी

Subscribe

सध्याचे युग हे डिजिटल युग समजले जात असून आता नागरिकांनी आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारीवर इंटरनेटच्या माध्यमातून उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडिया डॉक्टरांची डोकेदुखी ठरत आहे.

‘सध्याचे युग हे डिजिटल युग समजले जात असून सर्वांच्याच मोबाईलवर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय खावे काय खाऊ नये, डायट प्लॅन, वजन कमी करण्याच्या टिप्स, डॉक्टरांच्या मुलाखती याचा भडीमार सुरु असतो. परंतु या सर्व सूचना अथवा डॉक्टरांचे अभिप्राय आपण किती पाळावे अथवा ते वाचून त्यावर उपचार करणे याबाबत योग्य तो खुलासा कोठेही होताना दिसत नाही. सोशल मीडियावर येणारी माहिती ही योग्यच असल्याची समज असलेली युवा पिढी आपल्या आरोग्याचे नुकसान करत असल्याचे दिसून येत असल्यामुळे सोशल मीडिया आता डॉक्टरांची डोकेदुखी ठरत आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून उपचार

वैद्यकीय उपचाराचा एकच मापदंड सर्वानाच लागू होत नाही ही समज देण्याची वेळ आता आली आहे. याच सामाजिक जाणिवेतून जागतिक हृदयदिनानिमित्त नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार डिजिटल मीडियाचा वापर करून स्वतःवर अथवा कुटुंबातील व्यक्तींवर उपचार करणाऱ्या लोकांची संख्या ही वाढत असून यामुळे भविष्यात आरोग्यविषयक समस्या वाढणार असल्याचे संकेत या निरीक्षणातून दिसून आले आहे. आरोग्य विषयक एखादी समस्या उदभवली तर डिजिटल युगाच्या आहारी गेलेला नागरिक सर्वप्रथम त्यावर उपाय करण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतो आणि तिथे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्यावर औषध-उपचार सुरु करतो. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने नवी मुंबई, ठाणे येथे राहणाऱ्या ३४० नागरिकांची मते जाणून घेतली असता यामधील जवळजवळ २०० नागरिकांनी आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारीवर इंटरनेटच्या माध्यमातून उपचार केले आहेत. परंतु, एखाद्या रोगाचे जर शरीरातून मुळापासून उच्चाटन करावयाचे असेल तर वैद्यकीय तपासण्या आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे तितकेच महत्वाचे आहे, असे मत सत्तर नागरिकांनी व्यक्त केले.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचलेल्या अथवा ऐकीव माहितीच्या आधारे जर तुम्ही सेल्फ ट्रीटमेंट म्हणजेच स्वयंउपचार करणार असाल तर ते फारच धोकादायक आहे. आजच्या धावत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी, वजन यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. आपले शरीर अनेकवेळा आपल्या बिघडलेल्या आरोग्याचे संकेत देत असतात तरीपण अनेकवेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वेळ आणि पैसे वाचविण्याच्या नादामध्ये अनेक नागरिक डॉक्टरांकडे येण्यास बिचकतात आणि हीच कारणे हृदयरोगवाढीस कारणीभूत ठरतात. सहा महिन्यापूर्वी सोशल मीडियामध्ये डायट प्लॅनवरून दोन समूह तयार झाले होते आणि ही चर्चा युवा नागरिकांमध्ये अधिक रंगली होती. प्रत्येकाचे शरीर हे वेगळे असून त्या शरीरात निर्माण होणाऱ्या समस्या सुद्धा वेगळ्या असतात. मधुमेह, उच्च रक्तदाब हे सायलेंट किलर असून याचा शरीरात झालेला प्रवेश अनेकवेळा कळतच नाही. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या बदलांवर आपण दुर्लक्ष करतो. हीच चूक हृदयविकार वाढण्यास कारणीभूत ठरते.  – डॉ महेश घोगरे; हृदयविकार तज्ञ व शल्यचिकित्सक, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल

आजकाल युवा पिढीमध्ये विशेतः महिलांमध्ये सडपातळ दिसण्याचा हट्टाहास कायम असतो. सडपातळ होण्यासाठी अनेकवेळा सोशल मीडियावर उपलब्ध असलेले उपाय व सल्ले अवलंबले जातात. अनेकवेळा या चुकीच्या सल्ल्यामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे कधीही हृदयविकाराचा त्रास नसलेल्या व्यक्तीमध्येही हृदय बंद पडण्याची शक्यता असते. वजन वाढू नये यासाठी भूक कमी लागण्याची औषधे घेतली जातात. फळांचा रस, पाणी, पॅकबंद पॅकेट्स यावर दिवस-दिवस ढकलले जातात. स्टिरॉइड घेतल्याचा दुष्परिणाम सुद्धा हृदयाच्या कार्यावर होत असतो त्यामुळे सडपातळ होण्याच्या नादात नकळत आपण आपल्या हृदयावर विपरीत परिणाम करत असतो.  – डॉ हेमंत खेमानी; हृदयविकारतज्ञ, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

- Advertisement -

४० टक्के मृत्यू हे हृदयविकारांमुळे

हृदयविकार, स्थूलता आणि मधुमेह हे विकार आधुनिक जीवनशैलीमधील बदलामुळे वाढत आहेत. भारतामध्ये जीवनशैलीच्या या आजारांनी संसर्गजन्य आजारांना मागे टाकून ते मृत्यूचे प्रथम क्रमांकाचे कारण झाले आहेत. भारत देश हा मधुमेहाची जागतिक राजधानी म्हणून ओळखली जात असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०२५ साली भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ४० टक्के मृत्यू हे हृदयविकारांमुळे होणार आहेत.


हेही वाचा – सोशल मीडियावरील वादानंतर भाजपा नेत्याला हवाय घटस्फोट!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -