घरमुंबईकल्याणच्या महावितरण कार्यालयात राडा; नागरिकांनी केली तोडफोड!

कल्याणच्या महावितरण कार्यालयात राडा; नागरिकांनी केली तोडफोड!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून कल्याण परिसरात विजेचा सातत्याने लपंडाव सुरु असल्याने कल्याणच्या वालधुनी परिसरातील नागरिकांनी तेथील महावितरणच्या कार्यालयात घुसून संगणकाच्या मॉनिटर-प्रिंटरची नासधूस केल्याची घटना काल (सोमवारी) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तर आज सकाळी (मंगळवारी) टिटवाळ्यानजीकच्या बल्याणी येथील नागरिकांनी मांडा येथील महावितरण कार्यालयावर धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव घालत जाब विचारला.

अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल

सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याणात पावसाने हजेरी लावली. त्यावेळी कल्याण पूर्वेत बहुतेक भागात सतत वीज जात असल्याने नागरिक हैराण झाले होते. थोडा वेळ पडलेल्या पावसाने उकाडा अधिकच वाढला होता. त्यातच वीज जात असल्याने रहिवाशांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला. परिसरातील नागरिकांनी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या वालधुनी एफ केबिन येथील कार्यालयात धाव घेतली. यावेळी संतप्त जमावाने कार्यालयाच्या लाकडी दरवाजाची फळी तोडत कार्यालयात प्रवेश केला आणि संगणकाचे मॉनिटर-प्रिंटर खाली आपटून फोडले. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

बल्याणीमध्ये देखील नागरिक संतप्त

दुसऱ्या घटनेत बल्याणी येथील संतप्त रहिवाशांनी मांडा येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तेथील अधिकाऱ्याला घेराव घातला. महावितरणच्या आनागोंदी कारभारामुळे सतत वीज जात असल्याने मंगळवारी पंचवीस ते तीस जणांनी महावितरण कार्यालयात दुपारीच्या सुमारास धडक दिली. यावेळी टिटवाळा पोलिसांनी तेथे धाव घेत संतप्त रहिवाशांची समजूत काढत अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, वेळेवर दुरुस्ती न करणे इत्यादी तक्रारी केल्या. टिटवाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिराव, पोलीस उपनिरीक्षक कमालाकर मुंडे, पोलीस नाईक सानप, काबंळे, कान्स्टेबल भांगरे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -