घरमुंबईमाहीममधून ६ वर्षाच्या मुलीच्या अपहरणकर्त्याला अटक

माहीममधून ६ वर्षाच्या मुलीच्या अपहरणकर्त्याला अटक

Subscribe

माहीम फाटक येथून ५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या २८वर्षीय तरुणाला माहीम पोलीसानी रंगशारदा येथील बाजार गल्ली येथून अटक केली आहे. नितीन बाबाजी नारकर असे या तरुणाचे नाव असून हा तरुण उच्चशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. जहाजावर नोकरीला असलेल्या नितीन या तरुणाला मासिक ५० – ६० हजार रुपये पगार आहे. घटनेच्या दिवशी त्याने मद्यप्राशन केल्यामुळे तो घरी गेला नाही. नशेतच तो पहाटेच्या सुमारास माहीम फाटक येथे स्वतःच्या ऍक्टिव्हा या दुचाकीवरून आला होता. त्यादरम्यान ५ वर्षांची मुलगी रडत असल्याचे बघून तिला खाऊ घेऊन देऊ या उद्देशाने तो मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून वांद्र्याच्या दिशेने घेऊन गेला. वांद्रे पोलीस ठाण्याजवळ असणाऱ्या एका दुकानातून मुलीला पाण्याची बाटली आणि खाऊ घेऊन दिला. त्यांनतर तो साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुलीला वांद्रे येथील लक्की हॉटेल येथे सोडून घरी निघून गेला होता, अशी माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याचा कुठलाही वाईट उद्देश नव्हता असे स्वतः आरोपीने पोलिसांना सांगितले.

घटना काय होती?

१ मे रोजी पहाटेच्या सुमारास माहीम फाटक येथे फूटपाथवर राहणाऱ्या एका कुटुंबातील ६ वर्षांच्या मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केले होते. मात्र १४ तासांनी ही मुलगी माहीम दर्गा येथे सुखरूप सापडली होती. तिच्यावर कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांच्या तपासात तसेच वैद्यकीय अहवालात उघडकीस आले होते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच माहीम येथे अशाच प्रकारे एका ५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या दोन महिन्यांनी माहीम फाटक येथे घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

- Advertisement -

असा पकडला आरोपी… 

१ मे रोजी माहीम फाटक येथून अपहरण केलेली ६ वर्षांची मुलगी पोलिसांना सुखरूप सापडली होती. मात्र आरोपी सापडला नसल्यामुळे मुलीचे अपहरण करण्याचा त्याचा उद्देश काही कळून येत नव्हता. तसेच जर आरोपी मोकाट असताना घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. माहीम पोलिसांनी या अपहरणकर्त्याचा शोध सुरू ठेवला होता. अखेर तपास पथकाने या मुलीला कुठे कुठे फिरवण्यात आले याची माहिती मिळवली. त्या अनुषंगाने तपास पथकाने त्या त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक स्पष्ट दिसून आला आणि त्या क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला वांद्रे रंगशारदा बाजार गल्ली येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -