घरमुंबईशिवाजी मंडईतील मासे विक्रेत्यांवरील कारवाईला तूर्तास स्थगित

शिवाजी मंडईतील मासे विक्रेत्यांवरील कारवाईला तूर्तास स्थगित

Subscribe

इमारत बांधकामाबाबत टॅक समितीचा अहवाल येईपर्यंत शिवाजी महाराज मंडईतील मासे विक्री व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांना स्थलांतरित केले जाणार नाही. तसेच कोळी महिलांना ऐरोलीला स्थलांतरित न करता याच विभागात स्थलांतरित केले जावे, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आश्वासन दिले आहे.

क्रॉफर्ड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार असलेल्या शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याने येथील बाजार आता मानखुर्द-ऐरोली या जकात नाक्याच्या जागेवर हलवला जाणार आहे. याबाबत कोळी समाजाकडून तीव्र विरोध होत असल्याने अखेर सत्ताधारी पक्ष जागा झाला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्तांसोबत बैठक घेऊन यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इमारत बांधकामाबाबत टॅक समितीचा अहवाल येईपर्यंत या मंडईतील मासे विक्री व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांना स्थलांतरित केले जाणार नाही. तसेच कोळी महिलांना ऐरोलीला स्थलांतरित न करता याच विभागात स्थलांतरित केले जावे, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आश्वासन दिले आहे.

शिवाजी मंडईची इमारत धोकादायक असल्याने यातील घाऊक मासळी बाजार ऐरोलीच्या जकात नाका जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेच्या बाजार विभागाने घेत त्यांना जागा खाली करण्यासाठी नोटीस बजावली होती. याबाबत कोळी महिलांनी तीव्र विरोध करत कोणत्याही परिस्थिती जागा खाली न करण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी या महिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनीही कोळी महिलांना जागा खाली न करण्याच्या सूचना केल्या होत्या.

- Advertisement -

कोळी महिला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटल्याची बातमी पसरताच महापौरांनी शुक्रवारी तातडीने पत्र लिहून या मंडईतील मासे विक्री करणाऱ्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय स्थगित करण्यात यावा, असे निर्देश दिले. आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीत शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महापौरांनी, छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील कोळी महिलांना ऐरोली येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कोळी महिला अनेक वर्ष या मंडईत व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करत आहेत. तसेच मुंबईतील जनतेला चांगल्या प्रतीचे मासे उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे एकप्रकारे मुंबईकारांची काळजी घेत आहेत. मुंबईतील कोळी महिला या भूमिपुत्र असून यांना अचानक स्थलांतरित केल्यामुळे विभागातील नागरिकांशी त्याचे जोडलेले नाते संपुष्टात येईल. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होऊन त्यांची आर्थिक चणचण होईल, असे म्हटले आहे.

- Advertisement -

तरीही मंडईतील मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांना स्थलांतरित करण्याचा निर्णय टॅक समितीचा अहवाल प्राप्त होइपर्यंत स्थगित करण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत. तसेच या कोळी महिलांना ऐरोलीला स्थलांतरित न करता त्याच विभागातच स्थलांतरित करण्यात यावे, अशाही सूचना आयुक्तांना केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -