पंतप्रधान मोदी येणार मुंबई दौऱ्यावर, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन

PM Narendra Modi on Mumbai Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्य सरकारच्या व मुंबई महापालिकेच्या विविध योजनांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सोहळा म्हणजे आगामी पालिका निवडणुकीची चाहूल असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

PM Narendra Modi on Mumbai Visit | मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांना प्रतिक्षा लागून राहिली आहे. असे असतानाच १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते राज्य सरकारच्या व मुंबई महापालिकेच्या विविध योजनांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सोहळा म्हणजे आगामी पालिका निवडणुकीची चाहूल असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

हेही वाचा – अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा आतापर्यंत पालिका वर्तुळात होती. मात्र येत्या १९ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांच्या हस्ते राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन होणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांचेही उदघाटन व भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
यामध्ये, महापालिकेची तीन रुग्णालये, मलनि:सारण प्लांट, ४०० किमी लांबीच्या सिमेंट क्राॅकिटचे रस्त्यांची कामे, पंतप्रधान स्वनिधी निधी योजनेच्या अंतर्गत फेरीवाल्यांना कर्ज वाटप करणे, आपली चिकित्सा योजने अंतर्गत भांडूप सुपरस्पेशालिटी रूग्णालय, ओशिवरा प्रसुतीगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय यांच्या पुनर्विकासाचे काम आदी कामांचा समावेश आहे.

हेही वाचा – पक्षप्रमुख पदावरून आता दोन्ही गटांत रस्सीखेच, शिंदे गटाने शिवसेनेची घटनाच वाचून दाखवली

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सत्ता राखणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपने मुंबईत अधिकाधिक विकासकामे अल्पावधीत करण्याचा ‘विडा’ भाजपने उचलला आहे. मात्र निवडणुकीला सामोरे जाताना पालिकेची काहीतरी ठोस विकासकामे मार्गी लावून मुंबईकरांकडे हक्काने मते मागण्याचा भाजप व शिंदे गटाचा प्रयत्न असून त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.