Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई राज ठाकरेंची नोटबंदीवरुन टीका, देवेंद्र फडणवीसांनी दिले 'असे' प्रत्युत्तर

राज ठाकरेंची नोटबंदीवरुन टीका, देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘असे’ प्रत्युत्तर

Subscribe

नागपूर : नोटबंदीनंतर देशात चलनात आलेली 2 हजार रुपयांची नोटाही चलनातुन मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी (19 मे) घेतला. या निर्णयानंतर सत्ताधारी समर्थन करत असले तरी विरोधकांनी मात्र मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी असे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असे म्हटले. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

2 हजार रुपयांच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑक्टोबरपर्यंत या नोटा बदलता येणार आहेत. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा आहेत, ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे, त्यांना चिंता करण्याची गरज नाही. कोणी काळा पैसा जमा करुन ठेवला असेल तर त्यांना त्रास नक्कीच होणार आहे. कारण, त्यांना हे सांगावं लागेल की इतक्या नोटा त्याच्याकडे आल्या कुठून?, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2 हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय यासाठी घेतला कारण बाजारात आयएसआय (ISI) च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फेक नोटा वापरात आणल्या जात आहेत. त्यांना रोखण्यासाठी, त्यांचा डाव उधळण्यासाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. यापूर्वीच्या नोटबंदीवेळीही ती गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवली. त्यामुळे फेक करन्सीवर आपण बंदी घालू शकलो, असेही फडणवीसांनी सांगितले.

- Advertisement -

काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला आठवत असेल तर त्याचवेळी मी एक भाषण केले होते. हा जो धर-सोडपणा आहे, तो चुकीचा आहे. तज्ज्ञांना विचारुन असे निर्णय घ्यायचे असतात. त्यावेळी नव्या नोटा आणल्या त्या एटीएममध्ये जात नव्हत्या. नव्या नोटा या एटीएम मशिनमध्ये जातात की नाही, हेही पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. उद्या लोकांनी बँकेत नोटा परत द्यायच्या, पुन्हा तुम्ही नवीन नोटा आणायच्या. असे जनतेवर प्रयोग करायचे नसतात. असं सरकार चालत नसतं. अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी नोटबंदी आणि आता २००० रुपयांची नोट बंद करण्यावर केली आहे.

हेही वाचा – ₹ 2000 Note : स्वयंघोषित विश्वगुरूंचे हे वैशिष्ट्य… विरोधकांचे टीकास्त्र

2 हजार रुपयांच्या नोटांवर बंदी
नोव्हेंबर 2016मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नोटाबंदीनुसार 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरबीआयने 2 हजार रुपयांची नोट चलनात आणली. 2016-17 या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2 हजार रुपयांची एकही नोट छापलेली नाही. यानंतर आता आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणली असून त्या नोटा बँकांमध्ये बदलून घेण्याचे आवाहन केले आहे. या नोटा बदलण्याची प्रक्रिया येत्या 23 मेपासून सुरू होणार आहे. नागरिक 30 सप्टेंबरपर्यंत एकावेळी फक्त 20 हजार रुपयांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तथापि, यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.

- Advertisment -