मला डिवचू नका, साहेबांना कोणी त्रास दिला ते सांगेन; नारायण राणेंचा इशारा

आम्हाला साहेबांचे वेड होते. ते का होते याचा विचार आताच्या नेत्यांनी करायला हवा. बाळासाहेब असते तर आता जे घडलं आहे ते घडलंच नसंत. तेव्हा बाळासाहेबांबद्दल कोणी काही बोललं तर त्याला उत्तर मिळायच. आता कोणीही येतय आणि काहीही बोलून जात आहे. पण त्याची प्रतिक्रिया काही उमटत नाही. 

Narayan-Rane

मुंबईः मला डिवचू नका. बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं मला हे सर्वांना सांगेन, असा धमकीवजा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी दिला. विधिमंडळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात आले. त्या कार्यक्रमात मंत्री राणे बोलत होते.

ते म्हणाले, बाळासाहेबांना शिवसैनिकांनी त्रास दिला नाही. बाळासाहेब मला बोलवायचे. जवळ बसवायचे. मानसिक त्रास होतोय सांगायचे. हा त्रास कोणी दिला हे मी सांगणार नाही. पण मला डिवचू नका, नाही तर मी सर्व सांगेन, असे म्हणत मंत्री राणे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नजर टाकली. कुठेही आहे भुजबळ. भुजबळांनी माझ्या बोलण्याला होकार दिला आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

पुढे मंत्री राणे म्हणाले, काहीजण आता शिवसेना शिकवत आहे. पण साडेसातनंतर मातोश्रीवर माझी वेळ असायची. माझ्यापेक्षा इतर कोणाची वेळ होती का हे कोणालाही विचारा. आम्हाला साहेबांचे वेड होते. ते वेड का होते याचा विचार आताच्या नेत्यांनी करायला हवा. बाळासाहेब असते तर आता जे घडलं आहे ते घडलंच नसंत. तेव्हा बाळासाहेबांबद्दल कोणी काही बोललं तर त्याला उत्तर मिळायच. आता कोणीही येतय आणि काहीही बोलून जात आहे. पण त्याची प्रतिक्रिया काही उमटत नाही.

मला मुख्यमंत्री केल. तेव्हाही काहीजण मांजरीसारखे मध्ये आले. मी तेव्हाही अशा मांजरांची दखल घेतली नाही. डुप्लिकेट वाघांची तर अजिबात दखल घेत नाही. कोणतेही पद किंवा सत्ता नसताना बाळासाहेबांना मानसन्मान होता. आताच्या कोणत्याच नेत्याला तसा मानसन्मान मिळत नाही आणि मिळणारही नाही. आम्हाला साहेबांनी तयार केलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका, असा टोलाही मंत्री राणे यांनी यावेळी हाणला.

दूरदृष्टी असलेला नेता- अजित पवार

बाळासाहेब हे दूरदृष्टी नेते होते. त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची संकल्पना मांडली. ही संकल्पना पूर्ण करण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी भाजपचे मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवली. ही जबाबदारी सोपवताना बाळासाहेबांनी पक्ष बघितला नाही, असे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी सांगितले.

झोपताना विचार करा बाळासाहेब काय बोलले असते- निलम गोऱ्हे

आज बाळासाहेब असेत तर काय बोलले असते याचा विचार येथे बसलेल्या सर्वांनी रात्री झोपताना करावा, असा सल्ला सभापती निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिला. विठ्ठलाकडे जाताना कोणाच्या हातात झेंडा आहे हे बघितलं जात नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या तैलचित्राचे आम्हीही समर्थन केले. मात्र आम्ही केलेल्या सुचनांचा विचार केला गेला नाही, याची आठवण सभापती गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करुन दिली.