घरमुंबईमुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न पाहणारे राजकीय जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले

मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न पाहणारे राजकीय जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले

Subscribe

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुन सुरु झालेला शुद्ध-अशुद्ध भगव्याचा वाद थांबायचे नाव घेत नाही आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशुद्ध भगवा उतरवून शुद्ध भगवा मुंबई महापालिकेवर फडकवणार, अशी घोषणा केल्यानंतर शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, शिवसेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न पाहणारे राजकीय जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

“मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल. मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल. इतिहासाच्या पानोपानी याचे दाखले आहेत. मुंबई महापालिकेवर नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा ‘युनियन जॅक’ फडकविण्याची भाषा करणाऱ्यांनी हे विसरू नये. मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, पण त्या जिंकताना त्यांचा कसा दम निघाला ते देशाने पाहिले.,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

- Advertisement -

“बिहारच्या विजयाने भाजपचा नक्की कोणता झेंडा पाटण्यावर फडकला आहे? विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारवर भगवा फडकवू किंवा भगवा फडकला असे विधान भाजप पुढाऱ्यांकडून झाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला. भाजप शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपमध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील व त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्न,” असा टोला देखील शिवसेनेने लगावला.

“मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही 105 मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे. छत्रपती शिवरायांचा त्याग, त्यांचे हजारो, लाखो मावळे, महाराष्ट्र घडवताना कामी आलेल्या मर्द मराठय़ांच्या रक्ताचे शिंपण या भगव्यावर झाले आहे. दिल्लीच्या अजगरी जबडय़ातून मुंबईची सुटका करण्यासाठी मराठी माणसे गोळय़ा, लाठय़ांची पर्वा न करता रस्त्यावर उतरली. त्यांच्या रक्ताच्या तेजाने हाच भगवा सूर्यतेजाला आव्हान देत असतो. हा मराठी अस्मितेचा, हिंदू तेजाचा अस्सल भगवा उतरविण्याचे कपट-कारस्थान जे करीत आहेत ते देशातील प्रखर हिंदुत्वाचा अपमान करीत आहेत,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

- Advertisement -

“जोपर्यंत पालिकेवर भगवा आहे तोपर्यंत महाराष्ट्र दुश्मनांचे पाशवी हात मुंबईच्या गळय़ापर्यंत पोहोचणार नाहीत. मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम याच तेजस्वी भगव्याने केले आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -