घरमुंबई... आणि ४० दिवसांच्या प्रयत्नानंतर बाळाचे प्राण वाचवले

… आणि ४० दिवसांच्या प्रयत्नानंतर बाळाचे प्राण वाचवले

Subscribe

जन्माला आल्या आल्या मृत्यूसमोर उभा होता. पण मध्यवर्ती हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टिम त्याला वाचवण्यासाठी प्राणपणाला लावून उपचार देत होती. अखेर ४० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुदृढ होऊन बाळ घरी जात असताना डॉक्टरांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. २८ नोव्हेंबर २०१८ ची सकाळची वेळ होती. टोकावडे ग्रामीण हॉस्पिटलमध्ये योगिता विनायक हिरवा या आदिवासी महिलेला प्रसुती कळा येत होत्या. तिने बाळाला जन्म दिला, पण बाळ रडत नव्हतं. बाळाने आईच्या पोटात शी केल्याने टोकावडे ग्रामीण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हिरवा कुटुंबियाना मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. शासनाच्या १०८ रूग्णवाहिकेच्या मदतीने सकाळी आठ वाजता मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये पोहचले. कर्तव्यावर असलेले बालरोग तज्ज्ञ रविंद्र रोकडे यानी बाळाला तपासले, बाळाचे प्राण वाचण्याची शक्यता शून्यात जमा होती.

याबाबत बालरोग तज्ज्ञ रविंद्र रोकडे यानी सांगितले की, त्या बाळाला आवश्यक असलेले उपचार मुंबईच्या शासकीय हॉस्पिटलमध्येच मिळू शकले असते. हिरवा हे आदिवासी कुटुंब असल्यामुळे त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला असता, बच्चूला दाखल करून घेत उपचार सुरू केले. त्यात डॉ. जान्हवी भोसले यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. पहिले पंधरा दिवस उपचार चालू असताना बाळ कोमात होता. हिरवा कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट असतल्याने डॉ. जान्हवी या स्वत:चा पदरमोड करून बाहेरची औषधं आणत होत्या.

- Advertisement -

याबाबत डॉ. जान्हवी भोसले यानी सांगितले की, जवळपास ५० लहान मुलांवर उपचार करण्यासाठी एकच बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे कोणा एका बाळाकडे लक्ष केंद्रित करणे सोपे नव्हते. असे असतानाही परिसेविका शुभांगी वाघ, ममता सहस्त्रबुध्दे, परिचारिका इंदिरा गावित, सुनिता पवार, पवित्रा नन्नावरे, पूनम पडवळ, संजिवनी काकरा, संगिता मोरे यानी या बाळाच्या उपचारावर लक्ष दिले. त्याचे लहान मुलांच्या आयसीयू केंद्रात प्रत्येकाशी एक प्रेमाचे नात जमले आहे. त्यामुळे या बाळाचा डिस्चार्ज होत असताना अश्रू अनावर झाले आहेत.

बाळाच्या आई योगिता हिरवा यांनी बाळाला पुर्नजन्म देणार्‍या मध्यवर्ती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे आभार मानले. त्यांच्यामुळेच माझे बाळ वाचले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबत मध्यवर्ती हॉस्पिटलचे जिल्हा शल्य चिकित्सक सुधाकर शिंदे यांनी लहान मुलांच्या आयसीयूमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -