घरमुंबईउपनगरीय रेल्वे स्थानकांची सुरक्षा वार्‍यावरच

उपनगरीय रेल्वे स्थानकांची सुरक्षा वार्‍यावरच

Subscribe

‘26/11’ ला ११ वर्षे होऊनही प्रवाशी सुरक्षा रामभरोसे

26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी सीएसएमटी स्थानकासह इतर ठिकाणी केलेल्या अतिरेकी हल्ल्याला मंगळवारी 11 वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र अद्याप मुंबईच्या रेल्वे स्थानकांची सुरक्षा वार्‍यावर आहे. मुंबईसारख्या संवेदनशील शहरातील अनेक रेल्वे स्थानकांत मेटल डिटेक्टर नाहीत. जिथे आहेत तेथील मेटल डिटेक्टरच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने काही मेटल डिटेक्टर भंगारात निघाले आहेत. तसेच रेल्वे पोलिसांकडे मनुष्यबळ कमी आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर आजही सुरक्षा व्यवस्था वार्‍यावर आहे. प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.

मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये ‘२६/११’च्या हल्ल्यानंतर तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला, रेल्वे स्थानकांत चेक पॉईंट उभारले होते. तिथे डोअर मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. तसेच रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांकडून हॅण्ड मेटल डिटेक्टरने प्रवाशांची तपासणी करत होते. मात्र कालांतरानेही हॅण्ड मेटल डिटेक्टर बंद पडले.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर रेल्वे स्थानकांवर लावलेले डोअर मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल करणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेक डोअर मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत आहेत. यासंबंधी रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रेल्वे स्थानकांवर लावलेल्या डोअर मेटल डिटेक्टरची देखभाल वेळच्या वेळी होत नसल्याने त्यातील अनेक मेटल डिटेक्टर आज बंद अवस्थेत पडून आहेत. तर काही भंगारात काढले आहेत. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर एकूण ३५ तर मध्य रेल्वेवर एकूण ९० डोअर मेटल डिटेक्टर आहेत. मात्र ही व्यवस्था उपनगरीय प्रवाशांची संख्या लक्षात घेता कमी आहे.

हॅण्ड मेटल डिटेक्टरचे काय झाले ?
उपनगरातील रेल्वे स्थानके सुरक्षेच्या दृष्टीने अति संवेदनशील असल्याने तिथे प्रवाशांप्रमाणेच सामान, पार्सलची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी काही टर्मिनसवर अद्ययावत डोअर मेटल डिटेक्टर, सामानांच्या तपासणीसाठी स्कॅनर आहेत. सीएसएमटी स्थानकात प्रत्येक गेटवर मेटल डिटेक्टर डोअर लावण्यात आले होते. तसेच रेल्वे पोलीस व आरपीएफकडून संशयित व्यक्तींच्या सामानांची हॅण्ड मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जात होती. मात्र, आता आरपीएफ जवानांच्या हातामध्ये हॅण्ड मेटल डिटेक्टर दिसत नाहीत. हे हॅण्ड मेटल डिटेक्टर असूनही त्याचा उपयोग होत नाही.

- Advertisement -

पोलिसांची संख्या कमी
मुंबईत असणार्‍या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर लोहमार्ग पोलिसांची एकूण १७ पोलीस ठाणी आहेत. ज्यामध्ये सध्या ३ हजार ४२३ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत. रेल्वे स्थानकांवर दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी समोर येत असून त्यांचा तपास सध्या संथगतीने सुरू आहे. रेल्वेत घडणार्‍या गुन्हेगारीने उच्चांक गाठला, पण त्यांची उकल होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे आज मुंबई विभागात ६ हजार पोलीस कर्मचारी हवे आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच रेल्वे पोलिसांची सुद्धा संख्या कमी आहे. मात्र त्यांना महाराष्ट्र सुरक्षादलाचे जवान मदतीला देण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ कमी असल्यामुळे आज आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांवर कामाचा बोजा वाढला आहे.

‘२६/११’च्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. मात्र या घटनेला रेल्वे विसरली आहे. रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनामध्ये गांभीर्य दिसून येत नाही. पुन्हा असा हल्ला झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात.
– सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

सुरक्षा, संरक्षण आणि सेवा हे रेल्वेचे ब्रीद आहे. मात्र यात रेल्वे कमी पडत आहे. रेल्वे ही सार्वजनिक व्यवस्था असून त्यांचे समाजाप्रती दायित्व आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनीही रेल्वेला सहकार्य करायला हवे. प्रवासात काही संशयास्पद वस्तू आढळून आली, तर त्याची माहिती त्वरित रेल्वे पोलिसांना देऊन सहकार्य करावे.
– हर्षा शाह, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -