घरमुंबईठाण्यात खारफुटीची कत्तल मासेमारीच्या मुळावर

ठाण्यात खारफुटीची कत्तल मासेमारीच्या मुळावर

Subscribe

खाडीतून मासे नामशेष...आगरी कोळी बांधवांच्या मासेमारीवर गदा

ठाणे शहराला खाडी किनार्‍यांनी वेढलेले आहे. पूर्वी खाडीत निवटे बोये जिताडा कोळंबी चिंबोर्‍या चिवणी आदी 70 प्रकारचे रूचकर मासे मिळत असत. त्यामुळे ठाणे खाडीत मासेमारीचा व्यवसाय तेजीत होता. पण आता खारफुटीची कत्तल आणि खाडीतील प्रदूषण वाढल्याने खाडीतून मिळणारी ही जीवसृष्टी नष्ट झाली आहे. त्यामुळे खाडी किनारीलगत असलेल्या आगरी कोळी बांधवांच्या मासेमारीच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे समाज बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ठाणे शहराजवळील असलेल्या कळवा खाडीवर सध्या मोठ्या प्रमाणात भराव घालून खाडी बुजविण्याचे काम अगदी राजरोसपणे सरूआहे. खाडीत भराव टाकण्यासाठी खारफूटीची कत्तल केली जात आहे. त्यावर अनधिकृत चाळी उभारल्या जात आहेत. तसेच झपाट्याने होणार्‍या नागरिकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे खाडी प्रदूषित होत आहे. मात्र हा प्रकार सुरू असतानाही, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी डोळयांवर पट्टी बांधून बसलेले आहेत. ठाण्यात बाळकूम खारेगाव विटावा कशेळी काल्हेर केवणी दिवे खारबाव आदी परिसरात आगरीकोळी बांधवाची वस्ती असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय केला जात होता.

- Advertisement -

कांदळवनाच्या तळाशी मासे अंडी देतात. त्यामुळे जीवसृष्टी वाढते. पण आता कांदळवनाची कत्तल होत असल्याने मासे अंडी देत नाहीत. तसेच प्रदूषित पाण्यामुळे पूर्वी मिळणारे निवटे बेाईत जिताडी कोळंबी चिंबोर्‍या चिवणी जीवसृष्टी नष्ट झाली आहे. खाडीतून मिळणारी ताजी मासळी चेंदणी कोळीवाड्यासह अनेक कोळी वाडयात स्वस्त दरात उपलब्ध होत असत पण आता खाडीतून मासे मिळेनासे झाल्याने खवय्यांना समुद्रातील माशांवर आपली भूक भागवावी लागत आहे.

कळवा खाडी किनारी सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बांधकामे झाली आहेत. खाडीत भराव टाकल्यामुळे मोठा पाऊस झाल्यास खाडीच्या पाण्यापासून अनेकांना धोका निर्माण होऊ शकतो. 26 जुलैच्या पुराचा सर्वाधिक फटका कळवा परिसराला बसला होता. कळव्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. या इमारतीत राहणार्‍या रहिवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे पालिका प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. खाडी किनार्‍यावरील कांदळवनाची कत्तल रोखण्यासाठी ठाणे महापालिका व महसूल विभागाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत, तसेच खाडीतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र त्यांच्याकडून कानाडोळा हेात असल्याचे दिसून येते. त्यामुळे खाडीला प्रदूषणापासून ते खारफुटीच्या कत्तलीपासून वाचवा अशी मागणी आगरी कोळी बांधवांमध्ये व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे मासे नामशेष झाले ….
बोईत, चिमणी, चिंबोरी, जिताडी, पोची, कोळंबी, निवट, खरबी, काळा मासा, शिवरा, मांगीन, पिळशा, घोडी, मांदेली बागडे यांच्यासह अनेक मासे नामशेष झाले आहेत.

गेल्या सात आठ वर्षापूर्वी खाडीत मोठया प्रमाणात मासेमारी केली जायची. विटावापासून ते आलिमघर पर्यंत मासेमारी केली जायची. खाडीत विविध प्रकारची मासे विपूल प्रमाणात होते. आगरी, कोळी बांधवांची उपजिवीकेचे साधन होते. खाडीतून काढलेली मासळी टेम्पोत भरून मुंबईत कॉफर्डे मार्केट येथे विक्रीसाठी नेली जायची. पण आता खाडी किनारी असलेली खारफूटीची कत्तल झाल्याने माशांची पैदास होत नाही. मासेच नष्ट झाल्याने मासेमारीच्या व्यवसायावर गंडांतर आलं आहे. त्यामुळे आगरी कोळी बांधवांना आता नोकरी करावी लागत आहे.
-विकास भोईर, स्थानिक रहिवाशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -