घरमुंबईभिवंडीत भाजप आणि शिवसेनेतील दिग्गजांची फिल्डींग?

भिवंडीत भाजप आणि शिवसेनेतील दिग्गजांची फिल्डींग?

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने युती केली असली तरी सुध्दा भिवंडी लोकसभा मतदारसंघात काहीस वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका त्यांना युतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता असून युतीतील वाद न समल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असेच चित्र सध्या तरी पाहावयास मिळत आहे.

भिवंडी – लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने युती केली असली तरी सुध्दा भिवंडी लोकसभा मतदारसंघात काहीस वेगळं चित्र आहे. भिवंडीत शिवसेना भाजपमधील हेवे दावे नेहमीच चव्हाटयावर आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना पुढाऱ्यांमधील वाद काही मिटत नसल्याने त्यांचे मनोमिलन करण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळीही पुढाकार घेताना दिसत नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका त्यांना युतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. युतीतील वाद न समल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असेच चित्र सध्या तरी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसचे तिकिट पदरात पाडण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतील काही दिग्गजांनी फिल्डींग लावल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत देशातले सर्वाधिक कापड कारखाने आहेत. हातमाग तुलनेने नगण्य असलेल्या भिवंडीत यंत्रमाग मोठ्या संख्येने आहेत. भिवंडीतील बहुतांश रोजगार हा या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधूनच निर्माण झाला आहे. या भागात कोकणातून स्थलांतरीत झालेले कोळी बांधव देखील मोठ्या संख्येने आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे मुस्लीम लोकसंख्या ६५ टक्क्यांच्या घरात असून देखील सामान्यपणे मुस्लिमांमध्ये आढळणारे साक्षरतेचे कमी प्रमाण इथे ८५% आहे. याच मुस्लिमांची ४ ते ५ लाख मते इथल्या निकालांवर प्रभाव पाडतात. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा इथे पहिल्यापासून प्रभाव आहे. मात्र, २०१४च्या मोदी लाटेने इथे भाजपच्या गळ्यात खासदारकी टाकली आहे. आघाडीच्या जागा वाटपात भिवंडी लोकसभा हा काँग्रेसच्या वाट्याला आहे.

- Advertisement -

काँग्रेसकडून भाजपाने खेचला मतदार संघ

२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेची योग्य वेळ साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कपिल पाटील हे भाजपमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षात दाखल झालेले कुणबी सेनेचे संस्थापक विश्वनाथ पाटील यांचा पराभव करीत विजय मिळवला. मनसेचे सुरेश म्हात्रे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील चित्र काहीसे वेगळे पाहावयास मिळत आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शहरीकरण झालेल्या कल्याण, भिवंडी या क्षेत्रासह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यासह वाड्याकडील ग्रामीण भाग येतो. तर आगरी कुणबी समाजाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून भाजपाने खेचून घेतला आहे.

भिवंडीत मतदारसंघाची लोकसभा

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती. तर मागील विधानसभा निवडणुकीत युती नव्हती. त्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये झालेली वादाची धग अजूनही धगधगत आहे. त्यातूनच भाजपने फोडाफोडीचे राजकारण करीत, शिवसेनेच्या ग्रामपंचायती आपल्या हातात घेण्याचे काम केले आहे. भाजपच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यासाठी शिवसेनेने भाजपला एकटे पाडले आहे. पंचायत समिती, ठाणे जिल्हा परिषद, कृषी समिती या निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी नवीन आघाडी करून आपली सत्ता स्थापन केली आहे. भिवंडी महापालिकेत सुद्धा काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता स्थापन करून, भाजपाला दूर ठेवले आहे. त्यामुळे युतीतील वाद अधिकच वाढत गेले आहेत. सध्या शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकऱ्यांमधील वाद विकोपाला गेले आहेत. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांना मदत करणार नसल्याची भूमिकाच शिवसेनेने उघडपणे घेतली आहे. त्यामुळे युतीतील मतभेद टोकाला गेल्याचे दिसून येत आहे. सध्या काँग्रेसमधून माजी खासदार सुरेश टावरे, विश्वनाथ पाटील, योगेश पाटील हे इच्छूक आहेत. तर भाजप मधील आर.सी.पाटील हे जुने काँग्रेसी असून, त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. पवार माझ्या पाठीशी खंबीर आहे, असे सांगितले होते. त्यामुळे पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा पसरली होती.

- Advertisement -

शिवसेनेकडून खेळली जाते खेळी

तसेच शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि कृषी समिती निवडणुकीत जे तंत्र वापरले तेच लोकसभा निवडणुकीत वापरण्याचे मनसुबे शिवसेनेकडून सुरू असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत भाजपला एकटे पाडण्याची खेळी शिवसेनेकडून खेळली जात आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभेत उमेदवार कोण असेल याकडं सर्वांच लक्ष वेधलय. त्याच प्रमाणे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांनी आघाडीकडे भिवंडी लोकसभेची एकमेव उमेदवारी मागितल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असुन दुसऱ्या पक्षातील येणाऱ्या उमेदवारांची चांगलीच गोची झालीय मात्र आघाडी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.


वाचा – एप्रिल – मे दरम्यान लोकसभा निवडणूक होण्याची ही पाचवी वेळ


विधानसभा मतदारसंघ – आमदार

  • भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती) – शांताराम मोरे – शिवसेना
  • शहापूर (अनुसूचित जमाती) – पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी काँग्रेस
  • भिवंडी पश्चिम – महेश चौघुले – भाजप
  • भिवंडी पूर्व – रुपेश म्हात्रे – शिवसेना
  • कल्याण पश्चिम – नरेंद्र पवार – भाजप
  • मुरबाड – किसन कथोरे – भाजप

वाचा – २३ – भिवंडी लोकसभा मतदारसंघ


२०१४ मधील आकडेवारी 

  • कपिल पाटील – भाजप – ४ लाख ११ हजार ०७०
  • विश्वनाथ पाटील – काँग्रेस – ३ लाख १ हजार ६२०
  • सुरेश म्हात्रे – मनसे – ९३ हजार ६४७
  • मधुकर पाटील – भाकप – १३ हजार ७२०
  • नोटा – ९ हजार ३११

मतदारसंघातील न सुटलेले प्रश्न

कल्याण टर्मिनर्स, भिवंडी रोड लोकल सेवा, यंत्रमाग उद्योगातील समस्या कायम ,वाढीव वीज समस्या, मुंबई – नाशिक महामार्गावरील राजनोली, माणकोली उड्डाण पूल अर्धवट अवस्थेत असल्याने रोजची वाहतूक कोंडी, रस्ते, पाणी, वीज समस्या कायम आहेत.


– रविंद्र शिंदे  

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -