घरमुंबईठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचे मनोमिलन

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचे मनोमिलन

Subscribe

पडद्याआडची शिंदे-आव्हाड मैत्री झाली खुली!

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडीची मोट बांधली जात असतानाच, गुरूवारी ठाणे महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले. महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के व उपमहापौरपदी पल्लवी कदम बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे ठाण्यातूनच महाविकासआघाडीची नांदी दिसून आली. त्यानिमित्ताने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे नेहमीच राजकारणाच्या पडद्याआड असणारी शिंदे-आव्हाड यांची मैत्री सर्वांसमोर खुली झाली.
राज्याच्या राजकारणात ठाणे जिल्ह्याचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे ठाणे नेहमीच राजकारणातील केंद्र बिंदू ठरत असते. ठाण्याच्या राजकारणात एडी आणि व्हिडी म्हणजेच आनंद दिघे आणि वसंत डावखरे यांची मैत्री नेहमीच चर्चेत राहिली. राजकारणाच्या पलिकडे अशी त्यांची मैत्री होती. सध्या ठाण्याच्या राजकारणात शिंदे-आव्हाड यांची मैत्री सर्वश्रूत आहे. पण ही मैत्री एकाच व्यासपीठावर कधीच दिसून आली नाही. मात्र ठाण्याच्या महापौर निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही मित्र एकाच व्यासपीठावर आले होते.

मागील 20 दिवसांपासून राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासआघाडीची मुहूर्तमेढ रोवली जात आहेत. तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू असल्याने, तिन्ही पक्षांची नेतेमंडळी अधिकच जवळ आली आहेत. या नव्या राजकीय समीकरणांमुळेच आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून ठाण्याच्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेत उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेनेच्या या आनंद सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नगरसेवक सहभागी झाले होते. शिंदे आणि आव्हाड यांनी एकाच व्यासपीठावरून नव्या महापौर उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शिंदे-आव्हाड मैत्रीही ठाणेकरांसमोर खुली झाली.

- Advertisement -

व्यासपीठावर एकनाथ शिंदे यांनी नव्या महापौर, उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी आता आम्ही दोघे (एकनाथ शिंदे- जितेंद्र आव्हाड) तुमच्या आजूबाजूला आहोत, असे वक्तव्य केल्यानंतर एकच हशा पिकला. आणि शिंदे- आव्हाड मैत्रीचं जुने पर्व नव्याने सुरू झाल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे या महाविकासआघाडीची ज्योत ठाण्यातूनच पेटविण्यासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या शिलेदारांना दिलेल्या संदेशाचे प्रतिबिंब ठाणे महापौर निवडताना सर्वांना दिसून आले. हाच पॅटर्न पुढे राज्यात सर्वत्र दिसणार आहे. या पॅटर्नची मुळे ठाण्यात रूजली गेली, हे आज सार्‍या महाराष्ट्राने पाहिले.

- Advertisement -

आमची राजकारणापलिकडची मैत्री – आव्हाड                                                                             नरेश म्हस्के माझा विद्यार्थी दशेपासूनचा मित्र आहे तर शिंदे आणि माझी राजकारणापलिकडची आमची मैत्री आहे. एका सामान्य कुटूंबातील शिवसैनिकाला महापौरपदी विराजमान केल्याबद्दल आव्हाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची प्रशंसा केली. आमच्या वाटा, विचारधारा जरी वेगळ्या असल्या तरी मित्रत्वाचे नाते कायम असते. राजकारणापलिकेकडे मैत्री टिकावी असा आदर्श शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिला आहे. त्याच आदर्शावर आम्ही दोघे वाटचाल करतो, अशा शब्दांत आव्हाड यांनी शिंदे यांच्या मैत्रीविषयी बोलताना भावना व्यक्त केली.

आव्हाड आणि सहकार्‍यांचे आभार – शिंदे                                                                                      ठाणेकरांनी 25 वर्षे शिवसेनेला सत्ता दिली. शिवसेना प्रमुखांनी ठाण्यावर प्रेम केले. धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या विकासाला सुरूवात केली, ही परंपरा कायम ठेवण्याचे प्रयत्न आपण करत आहोत. ठाण्याने पहिली सत्ता शिवसेनेला दिली आणि सत्तेची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली त्यामुळे ठाणे आणि शिवसेनेचे आगळेवेगळे नाते आहे. शहराचा विकास हाच अजेंडा असणार आहे. ठाण्याच्या राजकारणात विकासाचा मुद्दा येतो. तेव्हा सर्वपक्ष एकत्र येतात. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनंती केली. त्यांनीही मान ठेवला, त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकार्‍यांचे मनापासून धन्यवाद देतो, अशा शब्दात शिंदे यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -