घरमुंबई'गरज सरो, पटेल मरो' स्टेडियमच्या नामांतरावरुन भाजपवर शिवसेनेची टीका

‘गरज सरो, पटेल मरो’ स्टेडियमच्या नामांतरावरुन भाजपवर शिवसेनेची टीका

Subscribe

मोदी फकीर कधीही 'झोला' उचलून जंगलात जातील

सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे , उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘ गरज सरो , पटेल मरो ‘ हा त्याच नाटय़ाचा भाग आहे. मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता ? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे . पाच महापालिका निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला व भाजप विजयी झाला. सरदार पटेलांपेक्षा मोदी महान झाल्यानेच लोक त्यांना भरभरून मते देत आहेत. गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात

जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार पछाडलेले दिसत आहे. त्यात काही चुकले असे वाटण्याचं कारण नाही. आपल्या मातीवर प्रेम असणे हा गुन्हा नाही, पण आपण देशाचे नेतृत्व करीत आहोत हे भान विसरून कसे चालेल! अशा मोठय़ा कामांची जंत्री मोठी आहे म्हणून वाजंत्री लावून सांगण्याची गरज नाही. आज हा विषय वाजंत्री लावून चर्चेला आला आहे तो जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमला नरेंद्रभाई मोदी यांचे नाव दिल्यामुळे. गुजरातमध्ये मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होते. आता मोदी यांचे नाव दिलेले मोटेरा स्टेडियम जगात सगळय़ात मोठे असेल. मोदी यांचे नाव या मोठय़ा स्टेडियमला दिले हा टीकेचा विषय कसा काय होऊ शकतो? पण टीका यासाठी सुरू आहे की, मोटेरा स्टेडियमला आधी भारतरत्न सरदार पटेल यांचे नाव होते. ते बदलून मोदी यांचे नाव दिले.

- Advertisement -

पटेल यांचे नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न

गुजरातमध्ये आधी सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला. अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ म्हणजे स्वातंत्र्य देवतेच्या पुतळय़ापेक्षा सरदार पटेलांचा पुतळा उंच आहे व काँग्रेसने अपमानित केलेल्या सरदारांचा मानसन्मान, उंची वाढविणारा हा पुतळा असल्याचे श्री. मोदी यांच्याकडून सांगण्यात आले. पटेल यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा नेहरू-गांधी घराण्याने केला असे गेल्या पाचेक वर्षांत अनेकदा सांगण्यात आले, पण गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून ते मोदी स्टेडियम करावे असे काही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सुचविल्याचे दिसत नाही. पटेल यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करीत आहे, ते यानिमित्ताने दिसले.

बहुमत म्हणजे बेपर्वा वागण्याचा परवाना नाही

मोदी हे महान आहेतच. त्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही, पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असे मोदीभक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल. मुळात सरदार पटेलांचे नाव काढून मोदी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न व खटाटोप ज्यांनी केला त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लहान केले आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेतच, पण या काळातले एक बलदंड लोकप्रिय नेते आहेत. त्यांना लोकांनी प्रचंड बहुमत दिले आहे. बहुमत म्हणजे बेपर्वा वागण्याचा परवाना नाही. सरदार पटेल, पंडित नेहरू यांच्याकडे बहुमत होते ते देश घडविण्यासाठी. नेहरू यांनी आयआयटीपासून भाभा अणुशक्ती केंद्र, भाक्रा-नांगल योजना राष्ट्राला समर्पित केल्या. मोदी यांच्या काळात काय झाले, तर जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमला सरदार पटेलांचे नाव होते ते पुसून मोदींचे नाव दिले, असे त्यांच्या भक्तांना इतिहासात नोंद करून हवे आहे काय? सरदार पटेलांचे कालपर्यंत गुणगान गाणारे हे लोक एका स्टेडियमच्या नावासाठी सरदारविरोधी होतात, हा निव्वळ व्यापार म्हणावा लागेल.

- Advertisement -

गांधी-नेहरूंप्रमाणे ते पटेश देशाचे आदर्श

उद्या प. बंगालात सत्तांतर झाले तर (शक्यता अजिबात नाही) नेताजी बोस यांच्या नावे असलेल्या संस्थांची नावेही बदलली जातील अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. सरदार पटेल हे काही फक्त गुजरातचे पुढारी नव्हते. गांधी-नेहरूंप्रमाणे ते देशाचे आदर्श होते व आहेत, पण सरदार पटेलांचे कोणते आदर्श या सरकारने पाळले? स्वातंत्र्याच्या महाभारतातील ‘बारडोलीचा लढा’ हे अत्यंत तेजस्वी पर्व म्हणून समजले जाते. हा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांचा लढा होता व त्याचे नेतृत्व सरदार पटेलांनी केले. त्यानंतर दोनच वर्षांनी कराची येथे भरलेल्या शेहेचाळिसाव्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेलांची निवड झाली. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ”मी शेतकरी आहे!” (”हूं खेडूत छू!”) अशी गर्जना करणारे सरदार पटेल हे पहिलेच अध्यक्ष होते, पण आज देशातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? चार महिने झाले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे.

मोदी फकीर कधीही ‘झोला’ उचलून जंगलात जातील

आंदोलनातला शेतकरी सरदार पटेलांचा जयजयकार करीत आहे म्हणून सरदार पटेल यांच्या नावाची स्टेडियमवरील पाटी पुसण्यात आली काय? मोदी यांच्या सरकारला भव्यदिव्य, उत्कट असे काही करायचे असेल तर त्याचे स्वागत आहे, पण आधीचेच प्रकल्प रंगरंगोटी करून बदलण्यात व नामांतरे घडविण्यात काय हशील! अर्थात, जे घडले त्यात मोदींचा काही दोष नसावा. मोदी हे फकीर आहेत व कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील. त्यांचे भक्तच त्यांच्या नावाने हे भलतेसलते उद्योग करीत आहेत. मोदी हे एकदम योग्यासारखे तटस्थ व नम्र असल्याने ते या उद्योगांकडे थंडपणे पाहतात इतकेच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. पाच महापालिका निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला व भाजप विजयी झाला. सरदार पटेलांपेक्षा मोदी महान झाल्यानेच लोक त्यांना भरभरून मते देत आहेत. गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाटय़ाचा भाग आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -