घरमुंबईशिवसेनेत आयारामांना संधी, निष्ठावंतांकडे दुर्लक्ष

शिवसेनेत आयारामांना संधी, निष्ठावंतांकडे दुर्लक्ष

Subscribe

कट्टर शिवसैनिक, पदाधिकारी अडगळीतच

उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार्‍या मुळच्या सेवादलाच्या कार्यकर्त्या सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेत पाठवले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत कट्टर शिवसैनिक, पदाधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. बाहेरुन पक्षात येणार्‍यांसाठी रेड कार्पेट तर वर्षानुवर्षे आम्ही पक्षाच्या सतरंज्या उचलायच्या, मोर्चे आंदोलनात लाठ्या काट्या खायच्या असा सवाल आता अडगळीत पडलेले जुने पदाधिकारी विचारत आहेत. त्यामुळे शिवसेनेत आता जुने विरोधात नवे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
उर्मीला यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवली पण भघजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादातून उर्मीला यांनी काँग्रेस सोडली. पण कंगणा रानौतला सडेतोड उत्तर देणार्‍या आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत केल्याप्रकरणाची त्यांना विधानपरिषदेवर पाठवून बक्षिस दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उर्मीला मातोंडकर यांना शिवसेनेने ऑफर दिली आहे का यावर शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य करताना या चर्चा माध्यमांत सुरु आहेत, असे म्हटले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर का त्यांना फोन केला असेल तर ते दोघांमधील बोलणे मला माहित नाही. काही गोष्टी गोपनियेतच्या असतात असे सांगत सर्वांची उत्सुकता वघढवली. तसेच शिवसेनेत नवा आणि जुना असा वाद नाही. सर्वच जण पक्ष वाढवण्यासाठी काम करीत आहेत. काही जण पक्षाचे सहयोगी सदस्य झालेत तर काहींनी थेट पक्षात प्रवेश केल्याने, नाराजीच्या बातम्या केवळ मीडियात आहेत.

- Advertisement -

उर्मिला मातोंडकर यांच्या नावाच्या चर्चेवरुन शिवसेनेतील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. ज्यांचा पूर्वइतिहास काँग्रेस आणि विचारसरणी राष्ट्रसेवादलाशी संबंंधित असल्याने उर्मिलाला थेट विधानपरिषदेवर पाठवण्यापेक्षा शिवसेना चित्रपट सेनेशी संबंधित अभिनेते आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, सुबोध भावे आणि महिला म्हणून शिल्पा नवलकर पक्षवाढीसाठी काम करीत आहेत. अभिनेत्री शिल्पा नवलकर या मागील सहा वर्षांहून अधिक काळ चित्रपट सेनेच्या पदाधिकारी म्हणून काम करताना चित्रपटातील त्यांचीकारकिर्दही उजवीच असल्याचे चित्रपट सेनेतील एका पदाधिकार्‍याने आपलं महानगरशी बोलताना सांगतिले.

तसेच विद्यमान आमदार असलेल्या सुनिल शिंदे यांनी वरळी मतदारसंघाची जागा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसाठी ऑक्टोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सोडली होती. त्या सुनिल शिंदेंऐवजी दोन दशके राष्ट्रवादीत असणार्‍या सचिन अहिर यांना शिवसेनेच्या चार जागांच्या संभाव्य कोट्यातून जागा मिळत असल्याबद्दल वरळीतील जुने शिवसैनिक नाराज ी बोलून दाखवतआहेत. दोन वेळा नगरसेवक आणि एकदा आमदार झालेले सुनिल शिंंदे उपनेते होत नाहीत मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले अहिर मात्र उपनेते होतात याकडेही कार्यकर्ते बोट दाखवत आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठी सुनिल शिंदे यांचाच विचार व्हायला हवा, मूळ शिवसैनिकांचं काय होणार हा प्रश्न समोर येत आहे. तसेच जालनातून पराभूत झालेले अर्जुत खोतकर यांनाही विधानपरिषदेवर पाठवण्याबाबत मराठवाड्यातील शिवसैनिक आग्रह करीत आहेत. तसेच दक्षिण मुंबईतून महिला आघाडीच्या पदाधिकारी उपनेत्या मीना कांबळी यांना किती काळ ताटकळत ठेवणार अशीही कुजबुज सुरू आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या संभाव्य विधानपरिषदेच्या यादीमध्ये शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते सचिन अहिर, अभिनेत्री उर्मीला मातोंडकर आणि एका युवासेनच्या पदाधिकार्‍याचे नाव असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले उदय सामंत यांना लगेचच यूतीच्या काळात म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेने उदय सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपद दिले. मात्र सलग तीनवेळा राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचा भगवा फडकावणारे राजन साळवी मात्र आजही मंत्रीपदापासून दूर आहेत. तर अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. मंत्रीपद मिळाल्यानंतर शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कोल्हापूरचे राजेंद्र यड्रावकर आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांना पहिल्याच फटक्यात ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आले. यड्रावकर हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य आहेत. दुसर्‍या पक्षातून तिकिट मिळत नाही हे पाहून शिवसेनेत प्रवेश करणार्‍या आयारामांना मंत्री बनवल्यामुळे शिवसेनेत नाराजी कायम असून, आता शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या चार जागांवरील संभाव्य नावांवरुन पुन्हा एकदा कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

माजिवाडा-ओवला मतदार संघातून निवडून आलेले प्रताप सरनाईक हे तिसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आलेत, पण मंत्रीपदाने त्यांना यावेळी हुलकावणी दिली. त्यांच्यासह माजी राज्यमंत्री राहिलेले रविंद्र वायकर यांचीही हॅट्रीक कामी आली नाही (जोगेश्वरी पूर्व) आणि सुनिल प्रभू दोनदा दिंडोशीतून आमदार निवडून आल्यानंतर त्यांनाही प्रतोद पदावर बोळवण केली आहे. तसेच डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), प्रदिप जयस्वाल (औरंगाबाद मध्य), संजय गायकवाड (बुलढाणा), अनिल बाबर (खानापूर), वैभव नाईक हे सुद्धा दोनदा विधानसभेवर(कुडाळ-मालवण), संजय रायमुलकर (मेहकर), राजन साळवी तीन वेळा आमदार(राजापूर) आणि सुनिल राऊत दोनदा आमदार (विक्रोळी) हे जे निष्ठावंत आमदार आहेत यांना मंत्रीमंडळात कधी स्थान मिळणार असा सवाल आता शिवसेनेच्या शाखांमधून विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -