घरमुंबईसायन हॉस्पिटलमध्ये मातेच्या दुधावर संशोधन

सायन हॉस्पिटलमध्ये मातेच्या दुधावर संशोधन

Subscribe

वेळेपूर्वी जन्माला आलेल्या बाळाचे वजन कमी असणे, मातेला पान्हा न फुटणे, आई आजारी असणे, बाळाला काचपेटीत ठेवावे लागणे अशा अनेक बाबींमुळे अनेक नवजात बालकांना आईचे दूध मिळत नाही. या मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.

वेळेपूर्वी जन्माला आलेल्या बाळाचे वजन कमी असणे, मातेला पान्हा न फुटणे, आई आजारी असणे, बाळाला काचपेटीत ठेवावे लागणे अशा अनेक बाबींमुळे अनेक नवजात बालकांना आईचे दूध मिळत नाही. या मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्या दुधाचा बाळावर होणारा परिणाम आणि दूधदान केल्यामुळे आईला मिळणारे फायदे, दान केलेले दूध साठवणे व प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा यावर सायनमधील लोकमान्य टिळक महापालिका हॉस्पिटलमध्ये संशोधन करण्यात येणार आहे. देशामध्ये अशाप्रकारचे संशोधन प्रथमच करण्यात येणार आहे.

देशामध्ये दरवर्षी आईचे दूध न मिळाल्याने जवळपास 1.5 दशलक्ष नवजात मुलांचा मृत्यू होतो. मुलांना मातेचे दूध वेळेत मिळाले तर त्यांचा मृत्यू रोखणे सहज शक्य होईल. स्तनपानाच्या कमतरतेमुळे बाळाला अनावश्यक आजार होऊन ते अशक्त होते. अनेक मुलांना दूध मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन मुंबईतील सायन, केईएम, नायर, जे.जे., कामा व वाडिया या हॉस्पिटलमध्ये मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली. या दुग्धपेढीचा फायदा दरवर्षी हजारो मुलांना होतो. दूध दान करण्याचे प्रमाण वाढावे यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. त्याला महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

सायन हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सहा ते सात हजार महिला दूधदान करतात. या महिलांकडून वॉर्ड, ओपीडी व मातृदुग्धपेढीमधून दूध जमा केले जाते. जमा दूधावर प्रक्रिया करून ते बालकांना देण्यात येते. प्रक्रिया करताना तापमान किती ठेवल्यास त्यातील घटक कायम राहतात? दूध साठवण्याच्या प्रक्रियेत काही बदल करणे आवश्यक आहे का? प्रक्रियेदरम्यान दुधातील कोणते घटक कमी होतात. घटक कमी झालेले दूध बालकांसाठी सुरक्षित आहे का?, मातेने दूध दिल्यानंतर त्यातील जंतू मारण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करणे अशा विविध बाबींवर सायन हॉस्पिटलमध्ये संशोधन करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रथमच होत आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी दिली.

दुधाबरोबरच प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार्‍या यंत्रणेवरही सायन हॉस्पिटलमध्ये संशोधन होणार आहे. यामध्ये पूर्वी वापरत असलेली शेक वॉटर मशीन, अत्याधुनिक देशी बनावटीची मशीन व परदेशातून आयात केलेली मशीन यावर अभ्यास करण्यात येणार आहे. या तिन्ही मशीनचा सखोल अभ्यास करून एक चांगले उत्पादन बनवण्यात येणार आहे. हे उत्पादन शहरी भागातील दुग्धपेढीबरोबरच ग्रामीण भागातील दुग्धपेढीसाठीही उपयुक्त ठरेल, अशा दृष्टीकोनातून त्यावर अभ्यास करण्यात येणार आहे. नवजात बाळांना दूध मिळण्याबरोबरच संशोधनाला चालना मिळावी यासाठी ‘पाथ’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सायन हॉस्पिटलमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह लॅक्टेशन सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरचे सोमवारी अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संशोधन प्रकल्पासाठी फिलिप्स इंडिया कंपनीकडून निधी पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पाथ’च्या प्रकल्प अधिकारी मिनू सिन्हा यांनी दिली.

- Advertisement -

 

‘पाथ’च्या मदतीने करण्यात येणार्‍या या संशोधनासाठी हॉस्पिटलकडून जागेबरोबर समुपदेशक, नर्स, तंत्रज्ञ व हेल्पर पुरवण्यात आले आहे. ‘पाथ’चे समुपदेशक व तंत्रज्ञ यांच्या मदतीने संशोधनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर यामध्ये पालिकेचे अन्य तंत्रज्ञ, समुपदेशक यांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे.
– डॉ. जयश्री मोंडकर, अधिष्ठाता, सायन हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -