घरदेश-विदेशचक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

Subscribe

अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने अतिशय वेगाने सरसावत असून मुंबई-महाराष्ट्राचा धोका टळला आहे. मात्र वादळामुळे कोकण किनारपट्टीवर संततधार सुरू होती. गुरूवारी दुपारी हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिला आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर द्वारका आणि वेरावल याठिकाणी वायू वादळाचा मोठा परिणाम पहायला मिळेल.

या दोन्ही भागात ताशी १५५ किमी ते १६५ किमी वेगाने तर कमाल ताशी १८० किमी हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर हे वादळ पुढे समांतर अशा भागात सरसावणार असून सौराष्ट्र, कच्छच्या किनारपट्टी भागात या वादळाचा परिणाम असणार आहे. अमरेली, गिर सोमनाथ, दिऊ, जुनागड, देवभूमी द्वारका आणि कच्छ भागात या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जवळपास गुजरातच्या ५०० गावांना या वादळाचा फटका बसण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

सावधानतेचा उपाय म्हणून गुजरातच्या किनारपट्टीवरील दहा हजार पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हटवण्यात आले आहे. तर ५०० गावातील जवळपास अडीच लाख लोकांचेही स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले आहे. संपुर्ण रात्रभर गुजरातच्या किनारपट्टीवर पोलिसांकडून पेट्रोलिंग केले जाईल अशी माहिती गुजरात प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. एनडीआरएफची २६ पथकेही गुजरातच्या किनारपट्टीवर तैनात करण्यात आली आहेत. तसेच १४ एसआरपीएफ तुकड्या तसेच ३०० मरीन कमांडो याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तटरक्षक दल, नौदल आणि लष्कराच्या तुकड्याही याठिकाणी मदतीसाठी पोहचल्या आहेत.

महाराष्ट्रात आणि मुंबईत सागरी किनारपट्टीवर अतिशय दक्षतेची गरज असून या काळात समुद्राच्या लाटांचा आणि वार्‍याचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे झाड कोसळण्यासारख्या घटना घडू शकतात. मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा देत बोटी समुद्रात न नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

- Advertisement -

दुपारानंतर हे चक्रीवादळ गुजरातमधील पोरबंदरच्या दिशेने गेले. त्यामुळे गुजरातच्या समुद्र किनार्‍यांवर उंच लाटा उसळत होत्या. तसेच ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले होते. सोमनाथ येथे धुळीचे वादळ निर्माण झाले होते. गुरुवारी १३ तारखेला चक्रीवादळ प्रत्यक्षात गुजरात समुद्रकिनार्‍यांवर आदळणार आहे. या वार्‍यांचा वेग पहाता गुजरात प्रशासनाने समुद्रकिनारी रहाणार्‍या व्यक्तींना सुरक्षित जागी हलवले आहे. तसेच समुद्रकिनार्‍यांवर न जाण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे. केंद्र सरकारने गुजरात सरकारला आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाला सतर्क करण्यात आले असून गरज पडल्यास ते नागरिकांच्या मदतीला येणार आहेत.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. उद्या सकाळपर्यंत गुजरातच्या पोरबंदर आणि महुआ समुद्रकिनारी वायू चक्रीवादळाची धडक बसणार आहे. त्यामुळे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. तसेच पर्यटकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन विजय रुपाणी यांनी केले.

मुंबई पोलिसांचा एलर्ट
मुंबईकरांनी किनारपट्टी परिसरात जाणे शक्यतो टाळावे, तसेच किनारपट्टीच्या भागातही सुरक्षित अंतर ठेवावे. त्याचप्रमाणे कमकुवत झालेल्या झाडांखाली गाडी पार्किंग करणेही टाळावे असा एलर्ट मुंबई पोलिसांनी जारी केला आहे.

अस पडले नाव वायू
जागतिक हवामान संघटना आणि युनायटेड नेशन इकॉनॉमिक एण्ड सोशल कमिशन फॉर एशिया एण्ड स्पेसिफिक यांच्यामार्फत चक्रीवादळाचे नाव ठेवले जाते. बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका, पाकिस्तान आणि थायलंडमार्फत प्रत्येक देश आठ नाव सुचवतात. आठ देशांनी सुचवलेल आद्याक्षर घेऊन हे नाव सुचवले जाते. त्यानुसारच वायू हे नाव पुढे आले आहे. २००४ पासून वादळांना नाव देण्याची प्रक्रिया सुरू झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -