परिचारिकांचे काम बंद आंदोलन स्थगित, १५ जुलैपर्यंत ठोस उपाययोजनांचे आश्वासन

strike of nurses has been postponed
परिचारिकांचे काम बंद आंदोलन स्थगित, १५ जुलैपर्यंत ठोस उपाययोजनांचे आश्वासन

२३ मे पासून मुंबईत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने विविध १२ मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या संघटनेला मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा मनीषा शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

बाह्यस्त्रोतद्वारे परिचारिकांची करण्यात येणारी भरती बंद करण्यात यावी, नर्सिंग भत्ता ७ हजार २०० रुपये करण्यात यावा, धुलाई भत्ता वाढवण्यात यावा, पदवी शिक्षण घेतलेल्या परिचारिकांना केंद्राप्रमाणे वेतनवाढ द्यावी, पाळणाघर उपलब्ध करून द्यावे, विद्या वेतनामध्ये ५ हजाराची वाढ करण्यात यावी अशा बारा मागण्या परिचारिकांच्या संघटनेने सरकारकडे केल्या होत्या.

परिचारिकांच्या संघटनेने २६ मे पासून राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले होते. ३१ मे रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये १५ जुलैपर्यंत संघटनेच्या मागण्यावर ठोस उपाययोजना करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मान्य केले. यानंतर परिचारिकांचे कामबंद आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात येत आहे. मात्र, आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागू शकते, असे मनीषा शिंदे यांनी सांगितले.