विद्यार्थ्यांनी केला प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा निर्धार

Navi Mumbai

प्लास्टिकचे हजारो वर्षे विघटन होत नसल्यामुळे वातावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून प्लास्टिक हा पर्यावरणाचा आणि मानवी जीवनासह संपूर्ण जीवसृष्टीचा सर्वात मोठा हानीकारक शत्रू आहे. हे लक्षात घेऊन देश स्तरावर प्लास्टिक प्रतिबंधात्मक व्यापक मोहीम स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा या राष्ट्रव्यापी मोहिमे अंतर्गत हाती घेण्यात आली आहे. कोणतीही मोहीम समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक एकत्रित आल्याशिवाय पूर्णार्थाने यशस्वी होत नाही, हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 11 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा मोहिमेंतर्गत लोकसहभागातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

25 सप्टेंबरला नवी मुंबई शहरातील 1 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छ व प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा व्यापक जागर केल्यानंतर गुरुवारी शाळा शाळांमध्ये घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धांमध्ये महानगरपालिका तसेच खाजगी अशा 300 हून अधिक शाळांतील 60 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत प्लास्टिक प्रतिबंधाविषयीच्या आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या. या स्पर्धेकरता प्लास्टिकचे दुष्परिणाम, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई, तसेच प्लास्टिकचा भस्मासूर असे तीन विषय देण्यात आले होते. यावर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.