घरमुंबईगुणपत्रिकेअभावी विद्यार्थी विधी प्रवेशाला मुकणार

गुणपत्रिकेअभावी विद्यार्थी विधी प्रवेशाला मुकणार

Subscribe

विद्यापीठाच्या कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता

वेळेत निकाल लावण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून होत असला तरी गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळण्यास विलंब होत आहे. 25 जुलैपासून सीईटी सेलकडून विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये गुणपत्रिका मिळणार असल्याने सांगण्यात आल्याने त्यांच्यासमोर प्रवेश कसा घ्यायचा असा प्रश्न पडला आहे. गुणपत्रिका वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना विधी प्रवेशाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

तीन वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. राज्यातील विविध विद्यापीठांनी घेतलेल्या पदवी परीक्षांचे निकाल जाहीर झाले. परंतु मुंबई विद्यापीठाचे काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असले तरी विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. विद्यापीठाचे निकाल जाहीर न झाल्याने सीईटी सेलने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकली होती. गतवर्षी विद्यापीठाचे निकाल जाहीर होण्यापूर्वी सीईटी सेलने विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने अनेक विद्यार्थी न्यायालयात गेले होते. त्यामुळे यंदा सीईटी सेलने विद्यापीठाच्या निकालाची वाट पाहिली. परंतु विद्यापीठाने निकाल लावले असले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका सप्टेंबरमध्ये मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यातच विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेबाबत विचारणा होत असल्याने अखेर 25 जुलैपासून प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न दिल्याने त्यांच्यासमोर विधी अभ्यासक्रमाला प्रवेश कसा घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

विधी अभ्यासक्रमाचे अर्ज भरतेवेळी गुणपत्रिका आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थी सीईटी सेलकडे पाठपुरावा करू लागले आहेत. गुणपत्रिकेशिवाय प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेता येणार नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

निकाल वेळेत लावण्याबाबत विद्यापीठाला सूचना
विधी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा घेण्यापूर्वी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या प्रतिनिधींची एकत्र बैठक घेऊन त्यांना निकाल वेळेत लावण्याबरोबरच गुणपत्रिका वेळेत देण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. परंतु मुंबई विद्यापीठाने निकाल लावण्याला विलंब करण्याबरोबरच गुणपत्रिकाही विलंबाने देत आहेत. त्यामुळे प्रवेश पक्रिया रखडली आहे, अशी माहिती सीईटी सेलमधील अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisement -

वेळापत्रक जाहीर
विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गुरूवार (ता.25 जुलै) पासून 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होईल. विद्यार्थ्यांना 25 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधी अर्ज आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होईल. यादीबाबत विद्यार्थ्यांच्या काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांना 17 ते 20 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन हरकती नोंदवता येतील. अंतिम गुणवत्ता यादी 26 ऑगस्ट रोजी 3 वाजता जाहीर होईल.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालाच्या गुणपत्रिका कॉलेजांना पाठविण्यात येत आहेत. हे काम वेगाने सुरू असून विद्यार्थ्यांना लवकरच गुणपत्रिका उपलब्ध होतील.
– डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -