घरमुंबईरेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे सुपरसंडे ब्लॉक !

रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे सुपरसंडे ब्लॉक !

Subscribe

गणेश आगमन, खरेदी गर्दीत अडकणार

गणेशोत्सवासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली असताना मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेतल्याने त्याचा भार रस्ते वाहतुकीवर पडणार असल्यामुळे मुंबईकरांचा सुपरसंडे ब्लॉक होणार आहे, असे दिसत आहे. त्याचप्रमाणे आज रविवारचा सुट्टीचा मुहूर्त लक्षात घेऊन अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे आगमन सोहळे आहेत. त्यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसणार आहे. दरम्यान, मध्य आणि हार्बर रेल्वेने मेगाब्लॉक कायम ठेवला असला तरी पश्चिम रेल्वेने मात्र जम्बोब्लॉक रद्द केल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

मुंबईसह राज्यात सोमवारपासून गणेशोत्सवाची धूम सुरु होणार आहे. यासाठी अंतिम तयारी करण्यासाठी रविवारचा अखेरचा दिवस असणार आहे. यादिवशी मुंबईतील दादर, लालबाग, क्रॉर्फड मार्केट, विलेपार्ले यासारख्या महत्वाच्या बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळत असते. पण मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगादरम्यान सीएसएमटीच्या दिशेकडील जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने सुटणार्‍या जलद मार्गावरील सर्व लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येतील. सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणार्‍या जलद मार्गावरील सर्व लोकल संबंधित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबा घेतील.

- Advertisement -

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही दिशांकडे सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत, तसेच सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे, सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक काळात पनवेल ते अंधेरी या दरम्यानची लोकलसेवा रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी ते वाशी या स्थानकांदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक काळात विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. यासह प्रवाशांसाठी ट्रान्सहार्बर मार्गावरून ठाणे ते वाशी आणि नेरूळ या दरम्यान लोकल सेवा उपलब्ध असेल. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच ब्लॉकदरम्यान दादर आणि सीएसएमटीहून सुटणार्‍या एक्स्प्रेस मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येतील.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. त्यानंतर, दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकाहून चालविण्यात येईल. या गाडीतील प्रवाशांसाठी दादर स्थानकातून ३.४० वाजता दादर ते दिवा गाडी चालविण्यात येईल. ही गाडी ठाणे स्थानकात ४.०६ वाजता आणि दिवा स्थानकात ४.१६ वाजता पोहोचेल, असे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या या वेळापत्रकामुळे गणेशभक्तांना त्याचा फटका बसणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, शनिवारी मुंबईत मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणरायाचे आगमन सोहळे आयोजित केले होते. त्याचप्रमाणे रविवारी उर्वारित गणेशोत्सव मंडळांचे आगमन सोहळे आहेत. त्याचबरोबर घरगुती गणेशोत्सव साजरे करणारे गणेशभक्त रविवारीच आगमनाचा मुहूर्त साधणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने लालबाग, परळ आणि दादर या विभागात वाहतूक खोळंबा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मुंबईकरांना सुपर संडे धाकधकीचा ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -