घरमुंबईसिडकोच्या महत्वाच्या डाटा सेंटरला आग लावली की लागली ?

सिडकोच्या महत्वाच्या डाटा सेंटरला आग लावली की लागली ?

Subscribe

सिडकोच्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या डाटा सेंटरमध्ये सुट्टीच्या दिवशीच आग लागली. त्यात सर्व डाटा जळून खाक झाला. इस्टेट, मार्केटिंग, साडेबारा टक्के, प्लानिंग व इंजिनिअरिंग विभागाच्या सर्व महत्त्वाच्या फाइल्स त्या डाटा सेंटरमध्ये स्कॅन करून ठेवल्या होत्या. तर स्कॅनिंग करायच्या अनेक फाईल्स याच विभागात पडल्या होत्या. त्या सर्व फाईल्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अत्यंत महत्वाच्या विभागाला सुट्टीच्याच दिवशी आग लागल्याने नागरिकांमध्ये अनेक तर्क -वितर्क लढवले जात आहेत.या आगीची सिडको व्यवस्थापन चौकशी करणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केल्याने डाटा सेंटरच्या आगीतून संशयाचा धूर निघू लागला आहे.

सीबीडीतील सिडको भवन इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या डाटा सेंटरमध्ये रविवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर येथील आग आटोक्यात आणली. तरीही आगीमुळे सिडकोचे डाटा सेंटर कार्यालय पूर्णपणे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज सिडको अधिकार्‍यांनी व्यक्त केला असला तरी अग्निशमन दलाच्या पाहणी अहवालानंतर या आगीमागचे कारण स्पष्ट होईल, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

- Advertisement -

सिडको भवन इमारतीतील पहिल्या मजल्यावरच्या डाटा सेंटरमधील कॉम्प्युटरमध्ये सिडकोच्या सर्व महत्त्वाच्या फाइल्स व अन्य माहिती साठवून ठेवण्यात आली होती. याच सेंटरमध्ये आग लागली. आगीमुळे सिडको भवन इमारतीत धुराचे साम्राज्य पसरल्यानंतर येथील सुरक्षा रक्षकाच्या आग लागल्याचे कळले. त्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र तोपर्यंत आग संपूर्ण डाटा सेंटरमध्ये पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्यांच्या काचा फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासांनी आग आटोक्यात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंगच्या माध्यमातून आग विझविली.

या आगीमध्ये डाटा सेंटरमधील संपूर्ण एसी सिस्टीम, त्यासाठी उभारण्यात आलेले डक्ट, इलेक्ट्रिक पॅनल, डाटा सेंटरचे सर्व्हर, डाटा सेंटर नॉर्थ सेंटर, डाटा मॅनेजर केबिन, एनओसी रूम, कम्प्युटर रूम, त्याचप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सीबीडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. सिडकोच्या डाटा सेंटरचे सिस्टीम मॅनेजर म्हणून निलेश चौधरी हे अधिकारी काम पाहत होते. या अधिकार्‍याकडून योग्य त्या प्रकारे डाटा सेंटरचे काम होत नसल्याने व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली होती.

- Advertisement -

डाटा सेंटरला आकस्मिक लागलेल्या आगीची सिडको व्यवस्थापन चौकशी करणार आहे. डाटा सेंटरमधील रेकॉर्ड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असला तरी डाटा सेंटरमधील संपूर्ण डाटा हा महापे येथील एका सर्व्हरमध्ये संरक्षित आहे. तसेच, बंगळूर येथेही क्लाऊडवर तो उपलब्ध असल्याने हा सर्व डाटा सिडको परत प्राप्त करून घेईल.
लोकेश चंद्र – व्यवस्थापकीय संचालक,सिडको

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -