घरआली दिवाळी २०१८वाढत्या तापमानातही खरेदीचा उत्साह

वाढत्या तापमानातही खरेदीचा उत्साह

Subscribe

दिवाळीनिमित्त शहरातील बाजारातील प्रचंड गर्दी

मुंबई:-डोक्यावर आग ओकणारा सूर्य… तापमानाचा वाढलेला पारा… अंगातून निथळणार्‍या घामाच्या धारा… अशा वातावरणातही दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील सर्व बाजारांमध्ये रविवारी प्रचंड उत्साह व गर्दी दिसून येत होती. कॉफर्ड मार्केट, दादर व कुर्ला मार्केट रविवारी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. दिवाळीपूर्वीच्या पहिला रविवार असल्याने नागरिकांनी गर्दी केली असली तरी महागाईमुळे खरेदीवरही परिणाम झाल्याची भावना अनेक दुकानदारांकडून व्यक्त होत होती.

एक तारखेला झालेला पगार व त्यानंतर दिवाळीपूर्वी आलेला रविवार यामुळे शहरातील सर्व मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी प्रंचड गर्दी केली होती. दिवाळीनिमित्त घर सजवण्यासाठी आकाश कंदील, तोरण, पणत्या, रांगोळीचे रंग, रांगोळीचे स्टीकर्स घेण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली होती. त्याचबरोबर सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, कपडे, चादरी, इमिटेशन ज्वेलरी, नातेवाईकांना देण्यासाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू खरेदीसाठी बाजारामध्ये तरुणाईपासून ते वृद्धांपर्यंत सार्‍यांनी गर्दी केली होती. दिवाळीपूर्वीचा रविवार त्यातच मेगाब्लॉकमुळे रेल्वेला असलेली गर्दी व वाढलेला उष्मा याची तमा न करता अनेकजण सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडल्याचे चित्र होते. वाढलेले तापमान व मेगाब्लॉकची गर्दी न करता खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना महागाईमुळे वाढलेल्या किमतीमुळे घाम फोडला. खरेदीचा उत्साह असला तरी वाढत्या महागाईचा परिणामही दिसून येत होता.

- Advertisement -

दादर बाजारामध्ये पणत्या विक्री करत असलेल्या सगुणा गुजर या दिवे विकणार्‍या महिलेने गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी फारच कमी पणत्या विकल्याचे सांगितले. दरवर्षी आमच्या दिवाळीपूर्वीच पणत्यांची विक्री होत असे परंतु यावर्षी मात्र अद्याप अर्धाही माल विकला नसल्याचे गुजर यांनी सांगितले. यापूर्वी दिवाळीमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करून 15 ते 20 हजारांचा नफा कमवत असो, पण यावर्षी अद्याप मुद्दलच हाती आली नसल्याचे शिव सोंकणकर याने सांगितले. महागाईचा फटका जसा विक्रेत्यांना बसला आहे तसाच तो सर्वसामान्य नागरिकांनाही बसला आहे.

दरवर्षी मी दिवाळीमध्ये कपडे खरेदी करण्याबरोबरच माझ्या घरातील व्यक्तींसाठी भेटवस्तूही खरेदी करते. परंतु यावर्षी बाजारामध्ये फिरताना प्रत्येक गोष्टीची वाढलेली किंमत पाहून मी खरेदीबाबत हात आकडता घेतल्याचे चेंबूर येथे राहणार्‍या पूजा पाटील हिने सांगितले. दिवाळी व भाऊबीजेसाठी खरेदी करण्यासाठी मी माझ्या वडिलांसोबत दादर बाजारात आली. परंतु येथे पणत्या, रांगोळी, दिव्याची तोरणे, कंदिल यांच्या वाढलेल्या किमती पाहून आम्ही काही गोष्टी खरेदी करण्याचे टाळले. तसेच कपडे व भेटवस्तूंच्या किमती फारच वाढल्याचे लक्षात आल्याचे कांदिवली येथून दादरला खरेदीसाठी आलेल्या मोहिनी मुंढे हिने सांगितले.

- Advertisement -

फटाक्यांच्या विक्रीवरही परिणाम

न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक विक्रेत्यांनी दरवर्षीपेक्षा यावर्षी फारच कमी फटाके मागवले होते. यापूर्वी मी लाखापेक्षा जास्त फटाक्यांचा माल मागवत होतो. पण यावषी अवघ्या 60 हजाराचाच माल मागवला आहे. तसेच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा माल दरवर्षी मागवत असे, पण यावर्षी न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला तो माल मिळाला नाही. ग्राहकांचा कल जरी मोठ्या आवाजांचे फटाके फोडण्याकडे असला तरी ग्राहक फटाके खरेदी करण्यापूर्वी वारंवार विचारणा करत आहेत. ग्राहकांमध्ये असलेल्या संभ्रम वातावरणाचा व न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसत असल्याचे फटाके विक्रेता आनंद मिश्रा यांनी सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -