घरमुंबईभाईंदरचे नुकसानग्रस्त शेतकरी दुर्लक्षित

भाईंदरचे नुकसानग्रस्त शेतकरी दुर्लक्षित

Subscribe

लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी फिरकले नाहीत

परतीच्या पावसामुळे भाईंदरच्या मुर्धा ते उत्तन आणि चेणे भागातील शेतकर्‍याच्या भातपीकासह लागवड केलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडे शासनाने पाठ फिरवल्याने त्यांच्या नुकसानीचे पंचनामेच केले गेले नसल्याने शासनाकडून मदत मिळेल कि नाही? ही चिंता शेतकर्‍यांना पडली आहे.

मीरा भाईंदरचे झपाट्याने शहरीकरण झाले असले तरी आजही भाईंदरच्या मुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, तारोडी, उत्तन, पाली भागातील शेतकरी भातशेती करतात. तसेच तारोडी, डोंगरी, उत्तन भागातील शेतकरी भातपीकासह भाजीपाला लागवड करतात. काशिमीरा भागाततील चेणे, काशी, काजुपाडा भागात थोड्या प्रमाणात का होईना भातशेती लावली जाते.

- Advertisement -

परतीच्या पावसामुळे कापणीसाठी तयार झालेले भाताचे पिक आडवे झाले आहे. शेतामध्ये पाणी साचून असल्याने पिकाला कोंब फुटु लागली आहेत. काहींनी कापणी करुन ठेवलेले भातपीक पाऊस व पाणी साचून राहिल्याने हातचे गेल्यात जमा आहे. तयार भातपीकाचे पावसामुळे नुकसान झाल्याने बियाणे, खत, मजुरी, पाणी, वीज आदींचा खर्च वाया जाऊन घरच्यासाठी मिळणारा भातही गमावण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

भातशेती प्रमाणेच डोंगरी, तारोडी, उत्तन भागातील शेतकर्‍यांच्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या भातशेती व भाजीपाल्याच्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र प्रशासनाकडून कुणीही नुकसानीची पाहणी, पंचनामे करण्यासाठी या भागात फिरकलेले नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. शासनासह लोकप्रतिनिधींकडून शेतकर्‍यांच्या नुकसानीची विचारपूस केली गेली नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

शेतकरी आजही आपली पारंपारिक शेती करत आहे. सरकार आणि महापालिकेकडून शेती टिकवण्यासह शेतकर्‍यांचे हीत जोपासले जात नाही हे दुर्दैव आहे. परतीच्या पावसाने तोंडाशी आलेले भातपीक आणि लागवड केलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होऊन कोणी विचारपूस केलेली नाही.
-एडवीन घोन्सालवीस, माजी सरपंच, तारोडी

मोठे कष्ट करुन लावलेल्या भातशेतीची झालेली वाताहत बघवत नाही. नुकसान तर झाले आहेच. पण आम्हा शेतकर्‍यांना वाली तरी कोण आहे? जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी.
-सॅवियो बोर्जिस, शेतकरी

स्थानिक भुमिपुत्र शेतकर्‍यांच्या भातपीक आणि भाजीपाला लागवडीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने दिलीच पाहिजे. यासाठी आपण जिल्हाधिकारी, खासदार राजन विचारे व आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन यांना निवेदन देणार आहोत. शेतकर्‍यांना भरीव मदत नाही मिळाली तर आंदोलन करु.
-संदिप पाटील, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -