घरमुंबईशिवसेनेच्या भीतीने शहर सोडताहेत अयोध्येतील मुस्लीम

शिवसेनेच्या भीतीने शहर सोडताहेत अयोध्येतील मुस्लीम

Subscribe

बाबरी मशीद उदध्वस्त झाल्याच्या जुन्या आठवणी गाठीशी ठेऊन अयोध्येत येणारे बाहेरील हिंदू हिंसाचार घडवतील, या भीतीने अयोध्येतील मुस्लीम शहर सोडू लागले आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारणीचा संकल्प शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोडल्यानंतर तिथले वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच बुधवारी करणी सेनेची एक बैठक पार पडली. या बैठकीमुळे स्थानिक मुस्लीम लोकांमध्ये धडकी भरली आहे. याआधीचा अनुभव आणि करणीसेनेच्या सैनिकांच्या उपद्व्यापी कृत्यांमुळे अयोध्येतील वातावरण प्रचंड तापले होते. उध्दव यांच्या दौर्‍यानंतर पुन्हा एकदा करणी सेनेच्या बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठकांमुळे अयोध्येत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सलोखा आहे. पण बाहेरून येणारे शहरात हिंसा घडवत असल्याचे याआधीही उघड झाले आहे. यावेळी असे काही होऊ नये, यासाठी आतापासूनच स्थानिक मुस्लिमांनी शहर सोडून बाहेरचा रस्ता धरल्याचे सांगण्यात आले.

येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिर उभारणीचा संकल्प सोडण्यासाठी अयोध्येत जात आहेत. उध्दव यांच्या या दौर्‍याने अयोध्येतील वातावरण चांगलेच तापले आहे. उध्दव यांच्या या दौर्‍यात २४ आणि २५ नोव्हेंबरला भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. शरयू नदीतीरावरील पूजन आणि महाआरतीचे आयोजन आणि दुसर्‍यादिवशी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी लाखभर शिवसैनिक अयोध्येत येणार असल्याने शहरातील वातावरण आतापासूनच ढवळून निघाले आहे. यातच विश्व हिंदू परिषदेने सेनेच्या संवाद मेळाव्यादिवशी म्हणजे २५ नोव्हेंबरला अयोध्येतच संत संमेलनाची घोषणा केल्यामुळे वातावरण अधिकच बिघडले आहे. सेनेच्या संवादासाठी एकीकडे एक लाख कार्यकर्ते अयोध्येत जमणार असताना विहिंपच्या संत संमेलनाकरता तितक्याच संख्येने लोक येणार असल्याने बाबरी पतनाच्या दिवसासारखीच गर्दी शहरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील प्रस्तावित मेळावा आणि सभांमुळे येथील मुस्लीम समुदाय भयभीत झालेला दिसत आहे.

- Advertisement -

गर्दी वाढली की लोकांचे नुकसान होते. अयोध्येतील गर्दीने हिंदू आणि मुस्लीमही भीतीच्या छायेखाली असतात. १९९२ मध्ये अशाच गर्दीमुळे शहर हाताबाहेर गेले होते. तेव्हाही अशीच गर्दी जमवण्यात आली होती. जमलेल्या लोकांवर नेत्यांचे नियंत्रण नव्हते. याचा फटका तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना बसला आणि त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली.

न्यायालयाचा मान राखा

बुधवारी झालेल्या करणी सेनेच्या बैठकीने चांगले वातावरण बिघडू लागले आहे. अयोध्येतील कार्यक्रम कोणाचाही असो तो शिवसेनेचा असो किंवा विश्व हिंदू परिषदेचा. एवढी मोठी गर्दी जमवण्याची आवश्यकता काय? जे काही होणार आहे ते न्यायालयाच्या निवाड्यानंतर होणार असल्याने प्रत्येकाने निवाड्याचे पालन केले पाहिजे. असे असताना अयोध्येत एवढी मोठी गर्दी वाढवण्यामागील अर्थ काय?
– इक्बाल अन्सारी, याचिकाकर्ते, रामजन्मभूमी अयोध्या

- Advertisement -

१९९२ मध्ये अयोध्येत दोन्ही समाजाची घरे जाळण्यात आली. घरांची लूट करून ती पाडण्यातही आली. आजही अयोध्येत गर्दी वाढली की लोकांच्या मनात धडकी भरते. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला भीती वाढते. स्थानिक हिंदू आणि मुस्लीम घाबरतात. अफाट गर्दी, बाहेरचे लोक, कोणीच कोणाला ओळखत नाही. यामुळे आमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करुनच आम्ही संरक्षणाची मागणी करत आहोत. आजतरी संरक्षण मिळालेले नाही. आणखी दोन दिवस ते मिळाले नाही तर आम्ही २४ नोव्हेंबरच्या आधीच अयोध्या सोडून येथून निघून जाऊ.
– शमशाद अली परकार, सामाजिक कार्यकर्ते.

शिवसैनिक अयोध्येत जाणार असल्याने कुठलीही भीती कोणाच्याही मनात नको. बाळासाहेबांनी अयोध्येचे चांगलेच चिंतिले आहे. त्यांचा मुलगा अयोध्येत जात आहे. त्यांच्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. आमचे सैनिक काहीही करणार नाहीत, करू देणार नाहीत. अयोध्येतल्या नागरिकांनी निर्धास्त राहावे.
– खा.अनील देसाई, शिवसेना सचिव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -