घरमनोरंजनकथेत दम नसलेला, ‘व्हॅनिला’ स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट’

कथेत दम नसलेला, ‘व्हॅनिला’ स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट’

Subscribe

आजवर प्राण्यांवर अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यात आणखी एक भर म्हणजे ‘व्हॅनिला’ स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट’ हा चित्रपट. चित्रपटाचे नाव सोडता हा चित्रपट फारसा लक्षात रहात नाही. या चित्रपटातील प्रमुख पात्र म्हणजे व्हॅनिला आणि तेजू. व्हॅनिला म्हणजे कुत्री आणि तेजूची मैत्री हा या चित्रपटाचा विषय. मात्र ही कथा आणि मैत्री फुलवण्यात चित्रपट कमी पडलाय. त्यामुळे एका प्राण्यावर चित्रपट असून सुध्दा चित्रपट कंटाळवाणा होतो. केवळ चित्रपटात एखादा प्राणी आहे म्हणजे तो चित्रपट प्रेक्षकांना आवडेलच असं नाही. कारण चित्रपटाची कथा, दिग्दर्शनही तगडं असावं लागतं.

माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी ही गोष्ट घडते. चित्रपटातील मुख्य पात्र तेजूला (जानकी पाठक)आपल्या शाळेच्या आवारात असणार्‍या एका कुत्रीचा लळा लागतो. ती तिचं नाव व्हॅनिला असं ठेवते. तेजू व्हॅनिलासाठी दररोज शाळेत लवकर जाते. तिला सतत आंजरत गोंजारत असते. एक दिवस अशी काही परिस्थिती निर्माण होते की व्हॅनिलाला घेऊन तेजूला घरी यावं लागतं. सुरुवातीला तेजूचे बाबा याला विरोध करतात. व्हॅनिला घरी आल्यावर सगळ्यांनाच तिचा लळा लागतो. व्हॅनिला आता कायम तेजूच्या घरात राहते का? हे कळण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.

- Advertisement -

व्हॅनिला आणि तेजूची घट्ट मैत्री चित्रपटात असली तरी आंजरण्या गोंजरण्या पलिकडे चित्रपटात काहीच घडत नाही. त्यांच्या मैत्रीचा कोणताच खास असा प्रसंग चित्रपटात नाही. तेजू व्हॅनिलाशी खेळण्या आणि तिला खायला घालण्या पलिकडे फार काही करताना दिसत नाही. त्यामुळे चित्रपटात काही लक्षवेधक घडत नाही. उलट त्याच त्याच प्रसंगाचा कंटाळा येतो. चित्रपट बघावासा वाटत नाही. त्याचप्रमाणे चित्रपटातील अनेक पात्र ही कंटाळवाणी वाटतात. खरंतर व्हॅनिला आणि तेजूच्या मैत्रीचे दाखले देणारे अनेक प्रसंग चित्रपटात यायला हवे होते. त्यामुळे एक नाट्यमयता चित्रपटात निर्माण झाली असती. मुळात चित्रपटाच्या कथेतच दम नाहीये. खास अशी कथा चित्रपटाला लाभलेली नाही. चित्रपटाचा शेवटही अर्थहीन वाटतो.

तेजूची बहीण मंजू पवार हिला सतत इंग्रजीमध्ये बोलण्याची सवय असते. मात्र त्याचा सतत वापर चित्रपटात झाल्यामुळे कंटाळा येतो. तेजूच्या वडिलांची भूमिका रवी काळे तर आईची भूमिका राजश्री निकम यांनी उत्तम साकारली आहे. मात्र तेजूच्या भूमिकेत असणारी जानकी पाठक ही भूमिकेच्या वयापेक्षा मोठी दिसते. त्यामुळे त्या पात्राचा गोडवा तिच्यात येत नाही. अनेक ठिकाणी तिचा अभिनय जास्त वाटतो. माथेरानमध्ये ते घडत असलं तरी निसर्गाचा योग्य वापर चित्रपटात झालेला नाही. व्हॅनिलाचं गाणं असो किंवा मंजूच्या डोहाळेजेवणाचं, चित्रपटातील गाणीही एकदी बालिश वाटतात. एकंदरीतच चित्रपट त्याच्या नावाइतका मनोरंजक नाहीये. प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाही, तर कंटाळच येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -