घरमुंबईखड्ड्यांमुळे मुंबईकरांच्या वेगाला ब्रेक

खड्ड्यांमुळे मुंबईकरांच्या वेगाला ब्रेक

Subscribe

रस्त्यांवर वाहतूक कोंडी, महापौरही झाले त्रस्त

मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डे दिसू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होताना दिसत आहे. पी. डिमेलो रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, पूर्व द्रुतगती मार्गावरील किंग्ज सर्कल व माटुंगा, एलबीएस मार्ग, गांधी नगर, वांद्रे आणि खेरवाडी दरम्यान वांद्रे टी जंक्शन या प्रमुख मार्गांसह सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांनी रस्ते ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी चालवताना अतिशय सांभाळून चालवावी लागत आहे. पाण्याखाली गेलेले खड्डे चुकवता चुकवता चालकांच्या नाकी नऊ येत आहे. सोबतच या खड्ड्यांमुळे मुंबईकरांच्या वेगाला ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांचा त्रास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सुद्धा सहन करावा लागत आहे.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील प्रमुख मार्गांवरील खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असून मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महापौर बंगला असलेला ई.एस. पाटणवाला मार्गही खड्ड्यांना मुकलेला नाही. महापौर बंगल्यासमोरून जाणारा हा मार्ग पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला जोडतो. याच मार्गाने पुढे जे.जे.उड्डाणपुलावरून महापौरांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मनपा मुख्यालय गाठता येते.

- Advertisement -

महापौरांना सीएसएमटी गाठण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग बॅरिस्टर नाथ पै मार्ग होय. मात्र या मार्गाची अवस्था ई.एस.पाटणवाला मार्गाहून बिकट आहे. या मार्गावर जीवघेणे खड्डे पडले असून दुचाकीस्वारांचे सातत्याने अपघात घडतात. तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याची प्रतिक्रिया मनसेचे भायखळा विभागाचे रस्ते व आस्थापना प्रमुख आशिष चव्हाण यांनी व्यक्त केली.

वाहतुकीचा खोळंबा
मुंबई शहरासह उपनगरात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांना खड्डे सांभाळत वाहने हाकावी लागत आहेत. परिणामी, खड्डे असलेल्या ठिकाणी वाहन चालकांना वाहनांचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे कोंडी होत असून प्रवासासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ खर्ची घालावा लागत आहे. विशेष म्हणजे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडकडे पाहिले जाते. दर दिवशी या रस्त्यावरून हजारो वाहने ये-जा करतात. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे आधीच अरूंद असलेल्या या भागात वाहतूक कोंडी होत होती. अनेकदा चार एक किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -