घरमुंबईलसीकरण विद्यार्थ्यांना दुखणे मात्र मुख्याध्यापकांना

लसीकरण विद्यार्थ्यांना दुखणे मात्र मुख्याध्यापकांना

Subscribe

 रुबेला, गोवर लस देण्यासाठी १०० उपस्थितीचा सरकारचा फतवा

मुंबईसह राज्यातून रुबेला आणि गोवर नाहीसा व्हावा म्हणून राज्य सरकारने यासाठी विशेष लसीकरणास सुरुवात केली आहे. यावरून बराच वाद सुरु असताना आता यावरुन राज्यातील मुख्याध्यापकांमध्येही नाराजी पसरली आहे. या लसीकरणासाठी शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती असावी, असा फतवाच शिक्षण विभागाने काढल्याने हे लसीकरण मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी होऊन बसला आहे.राज्य सरकारतर्फे राज्यभरातील शाळांमध्ये सध्या रुबेला गोवरसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. हे लसीकरण ऐच्छिक असल्याचा दावा या अगोदरच शिक्षण विभागातर्फे करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही यावरुन बराच वादंग सुरु झाला आहे. हे लसीकरण राबविणार्‍या नोडल अधिकार्‍यांनी लसीकरणाच्या दिवशी शाळांमध्ये १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील याबाबत मुख्याध्यापकांना निर्देश दिले आहेत. पण शहरातील काही पालक ऐच्छिक असल्याचे सांगत लसीकरणाच्या दिवशी पाल्याला शाळेत पाठवत नसल्याने १०० टक्के उपस्थिती आणायची कशी, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा राहिला आहे.

रुबेला लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी व्हावी या उद्देशाने सरकारी पातळीवरून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र शहरातील काही पालक विविध कारणे देत या मोहिमेपासून दूर जात आहेत. यामुळे मुख्याध्यापकांना अशा पालकांची मने कशी वळवायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यातच या मोहिमेचे राज्याच्या नोडल अधिकार्‍यांना लसीकरणाच्या दिवशी १०० टक्के उपस्थिती असेल याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली आहे. मात्र लसीकरणाच्या दिवशी सुमारे १० टक्के पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्याने मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले तरी १०० टक्के उपस्थिती शक्य होत नसलयाचे मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी सांगितले. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. वेळप्रसंगी मुलांच्या घरीही जात आहेत, मात्र तरीही पालक तयार होत नसल्याचेही ते सांगत आहेत. अशा पालकांच्या पाल्यांना त्यांच्या डॉक्टरच्या माध्यमातून लस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते शक्य होऊ शकेल, असेही रेडीज यांनी सुचविले आहे.

- Advertisement -

दरम्यान, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक ही मोहिम यशस्वी करण्यासाठी झटत असताना गटशिक्षणाधिकारी मात्र याकडे काणाडोळा करत असल्याचे नोडल अधिकार्‍यांनी दिलेल्या पत्रावरून दिसून येत आहे. या पत्रात या लसीकरणांची ऑनलाइन माहिती केंद्र शासन, जागतिक आरोग्य संघटना यांना वेळेवर देण्यासाठी सरल प्रणालीच्या माध्यमातून स्टुडंट पोर्टलवर मेंटनन्स या टॅब खाली शाळांच्या लसीकरणाच्या नियोजित तारखांची नोंद करण्याची सुविधा गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. मात्र तशा प्रकारच्या नोंदी होत नसल्याचा आरोप नोडल अधिकार्‍यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात नवा प्रश्न उभा राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -