घरमुंबईखारफुटींचे ठाणे धोक्यात

खारफुटींचे ठाणे धोक्यात

Subscribe

आव्हान...र्‍हास रोखण्याचे...निसर्गाचा आणि मानवाचा

ठाणे शहराला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. विस्तीर्ण खाडी किनारा आणि किनार्‍यावरील कांदळवने, खारफुटी आणि त्यावर जगणारी जैवविविधता यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खारफुटीची सुरू असलेली बेसुमार कत्तल… मानवी अतिक्रमणे आणि औद्योगिक प्रगती यामुळे ही जैवविविधता नष्ट होऊ लागली आहे. ठाणे हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात असल्याने अनेक उद्योगांनी या भागात मोठा विस्तार केला होता. उद्योगांच्या रसायनमिश्रीत पाण्याने ठाण्याची खाडी प्रदूषित झाली आहे.त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या विकासाबरोबरच निसर्गाच्या र्‍हासाला सुरूवात झाली आहे. महापुरामुळे होणारा विध्वंसही खारफुटीच्या नाशामुळेच होतो..त्यामुळे खारफुटी वाचविणे हे महत्वाचं असून, ते वाचविण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे उभे आहे.

कळवा खाडीकिनारा परिसरात मोठया प्रमाणात झोपड्या उभ्या राहिल्या असून यामुळे खाडीकिनारी भागातील खारफुटी नष्ट होऊ लागली आहे. कळवा ते साकेत भागात मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधल्या जात आहेत. या झोपड्यांना पालिकेकडून करही लावला जात आहे. पालिकेकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांनी परिस्थिती जैसे थे दिसून येते. ठाण्यातील गायमुख, कोलशेत, बाळकूम परिसरांत दिवसाढवळ्या तिवरांची कत्तल सुरू आहे. मोठ्या प्रमाणात भराव टाकून बांधकाम केले जात आहे. कळवा येथील दत्तवाडी परिसरात खाडी बुजवून अनधिकृत चाळी उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, मुंब्रा रेतीबंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल मागील अयप्पा मंदिरालगतच्या खाडी किनारी मोठ्या प्रमाणात बेकायदा मातीची भरणी टाकली जात आहे. मागील सहा महिन्यांपासून या परिसरात तीनशेच्या आसपास अनधिकृत चाळीची बांधकामे सुरू आहेत. तसेच चेंदणी कोळीवाडा परिसरातही खारफुटी नष्ट करण्यात आली आहे. खाडीत मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट होत आहे. या बांधकामांमुळे खाडीचे मुख अरुंद होत चालले आहे. मात्र, याकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबध गुंतले असल्यानेच भूमाफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची चर्चाही ऐकायला मिळते.

- Advertisement -

कुंपणच ‘खारफुटी’ खातेय

ठाणे महापालिकेने खाडी किनारी सुशोभित करण्याचे काम हाती घेतले असतानाच, पालिकेच्या खासगी कंत्राटदाराकडूनही खारफुटीची कत्तल केली जात आहे. जर पालिका प्रशासनाचे अनभिज्ञता असेल तर इतरांना काय सल्ले देणार ? असा प्रश्न उपस्थित होतोय. ठाण्यात बाळकूम, खारेगाव, विटावा, कशेळी, काल्हेर, केवणी दिवे, खारबाव आदी परिसरांत आगरी कोळी बांधवाची वस्ती आहे. पूर्वी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय केला जात होता. कांदळवनाच्या तळाशी मासे अंडी देतात. त्यामुळे जीवसृष्टी वाढते. पण आता कांदळवनाची कत्तल होत असल्याने मासे अंडी देत नाहीत. तसेच प्रदूषित पाण्यामुळे पूर्वी मिळणारे बोईत, चिमणी, चिंबोरी, जिताडी, पोची, कोळंबी, निवट, खरबी, काळा मासा, शिवरा, मांगीन, पिळशा, घोडी, मांदेली बागडे यांच्यासह अनेक मासे नामशेष झाले आहेत. त्यामुळे आगरी- कोळी भूमिपुत्रांच्या मासेमारीच्या व्यवसाय बंद पडला आहे. त्यामुळे खारफुटीचे जतन महत्वाचे आहे.

खारफुटी म्हणजे काय ?

खार्‍या जमिनीमध्ये फुटणारी झाडे म्हणजे खारफुटी किंवा तिवरे असे म्हणता येईल. खार हा सापेक्ष शब्द आहे. पूर्ण खारे म्हणजे समुद्रातील आणि निमखारे म्हणजे खाडीत. खारफुटी ही सहसा या दोन्ही मधल्या भागात जास्त असते. कांदळ किंवा कांदळवन म्हणूनही तिला ओळखतात. तिवरे आणि कांदळ असेही यात प्रकार आहेत, असे अभ्यासक सांगतात.

- Advertisement -

निसर्गाची कत्तल

ठाणे जिल्ह्याला लांबच लांब असा खाडी किनारा लाभला आहे , ठाणे खाडी , कोपरी ,चेंदणी कोळीवाडा , महागिरी कोळीवाडा , विटावा कोळीवाडा , कळवा खाडी , जानकी नगर कळवा , दिघा ,बाळकूम ,घोडबंदर पट्यातील या खाडी किनारी खारफुटी विस्तीर्ण प्रमाणात आपणास आढळते. परंतु, भू माफियांनी या खारफुटीची कत्तल करून येथे मोठ्या प्रमाणात चाळी बांधल्या आहेत. त्यामुळे निसर्गाचा र्‍हास झाला आहे.

कचरायुक्त नाला खारपुटीसाठी धोकादायक

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी पट्ट्यात येत असलेल्या नवनवीन प्रकल्पांमुळे 2011 ते 2017 या सात वर्षांत खारफुटीची प्रचंड हानी झाली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खाडी, समुद्रकिनार्‍यामुळे खाडीक्षेत्र मोठे आहे. ठाणे जिल्ह्यातील खारफुटीचे मोठे क्षेत्र नाल्यातून, खाडीतून येणार्‍या कचर्‍यामुळे बाधित होत आहे. या कचर्‍यामुळे खारफुटीला धोका निर्माण झाला आहे. राज्य सरकारने चालू वर्षांत ठाणे जिल्ह्यात सुमारे तीन लाख खारफुटींचे रोपण करण्याचे लक्ष्य आखले आहे. मात्र, आहे त्या खारफुटीचे क्षेत्र कमी होत असताना ही खारफुटी वाचवण्यासाठी प्रयत्न तोकडे पडत आहेत. ठाणे आणि कळवा खाडी परिसर प्रचंड कचर्‍याने व्यापला आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामामुळे खारफुटी उद्धवस्त होत असताना कचर्‍यामुळे खारफुटीसमोर संकट उभे राहिले आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी या पट्ट्यात निवडक ठिकाणी खारफुटी शिल्लक आहे. तर दुसरीकडे खाडी, नाल्यांतून वाहून आलेल्या आणि नागरिकांनी टाकलेल्या कचर्‍यामुळे खारफुटीचे क्षेत्र नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रक्षणासाठी ‘इस्त्रो’चा ‘अ‍ॅप’प्रयत्न

मुंबईच्या किनारपट्टीवर असलेल्या खारफुटीची काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेसुमार कत्तल करण्यात येत आहे. मुंबईत वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे खारफुटी उध्वस्त करून त्या ठिकाणी निवारे बनविण्यात येत आहेत. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील खारफुटी नष्ट करून त्या जागी झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. तर नवी मुंबई, वाशी या ठिकाणी खारफुटीच्या जंगलात चोरीच्या आणि वृक्षतोडीच्या अनेक घटना देखील वाढल्या आहेत. या घटनांना चाप बसवण्यासाठी इस्त्रोची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (आयआयएसटी) ही संस्था एक अ‍ॅप तयार करत आहे. या अ‍ॅपद्वारे खारफुटीच्या जंगलात झालेली छोटीशी हालचाल देखील लगेच अधिकर्‍यांना कळणार आहे.

लाईफलाईन ठाण्याची खारफुटी जीवनदाहिनीच

मुंबई- ठाणे यांसारख्या शहरांत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत जात आहे.शहर म्हणजे येणार्‍या लोकांसाठी लाईफलाईन असले तरी खारफुटी या शहरांना जगवणार आहे.खारफुटीची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात. त्यामुळे जमिनीला आणि गाळाला धरून ठेवतात. हवेतील प्राणवायू घेतात. पूर, वादळ किंवा त्सुनामी आल्यास पाण्याचा लोंढा या वनस्पतीच्या मुळाशी झाडात तसेच पानांत अडतो जेणेकरून वाढलेली पाण्याची पातळी वस्तीपर्यंत पोहचत नाही. २६ जुलैचा महापूर हा खारफुटीच्या नाशाचे उदाहरण आहे. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी खारफुटीचे जतन महत्वाचे आहे. तसेच समुद्रात होणारे तेल, कचरा, रसायनाचे प्रदूषण खारफुटी शोषून घेते. प्रदूषण शोषणाची ताकद खारफुटीमध्ये मोठ्या प्रमाणात असते. तसेच तिच्या मुळाशी खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रीय गोष्टी साठतात. मासे, खेकडे किटकांचे ही वनस्पती म्हणजे नैसर्गिक अन्न आहे. खारफुटीच्या मुळाशी मासे खेकडे अंडी सुध्दा घालतात. त्यामुळेच आता लोप लावलेला मच्छिमार व्यवसाय ठाण्यात तेजीत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -