घरमुंबईउद्धव, राज ठाकरेंच्या शिक्षिकेच्या नशिबी उपेक्षा!

उद्धव, राज ठाकरेंच्या शिक्षिकेच्या नशिबी उपेक्षा!

Subscribe

दादरच्या बालमोहन विद्या मंदिरच्या शिक्षिका, वसईतील वृद्धाश्रमात एकाकी जिणे, तौत्के चक्रीवादळाने वृद्धाश्रम उद्ध्वस्त, शिक्षिकेसह २९ वृद्ध उघड्यावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना घडवणार्‍या शिक्षिका वसईतील एका वृद्धाश्रमात सध्या एकाकी जिणे जगत आहे. या शिक्षिकेच्या एकाकी जगण्यावर सुद्धा आता संकट आले आहे. गेल्या सोमवारी, १७ मे रोजी आलेल्या तौत्के चक्रीवादळाने या वृद्धाश्रमाचे पत्रे उडून गेल्यानंतर येथील २९ वृद्ध उघड्यावर आल्यावर ठाकरे बंधूंना शिकवणारी शिक्षिका याच वृद्धाश्रमात राहत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

सुमन रणदिवे असे या शिक्षिकेचे नाव असून पती आणि मुलाच्या निधनानंतर त्या वर्षभरापूर्वी वसईतील सत्पाळा गावातील न्यू लाईफ केअर वृद्धाश्रमात आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह मुंबईतील अनेक बड्या राजकीय नेत्यांना रणदिवे यांनी दादर येथील बालमोहन विद्या मंदिर शाळेत शिक्षणाचे धडे दिले आहेत. मात्र, सध्या त्या सत्पाळ्यातील वृद्धाश्रमात जीवन कंठीत असून त्यांच्यासह २९ वृद्ध या ठिकाणी राहत आहेत.

गेल्या सोमवारी आलेल्या वादळाने या वृद्धाश्रमाच्या घरावरील सर्व पत्रे उडाले. अचानक वादळ आल्याने सावरायला वेळदेखील मिळाला नाही. सर्व वयोवृद्धांचे सामानसुमान आणि कागदपत्रे चक्रीवादळात आलेल्या पावसाने भिजून खराब झाली आहेत. बिछाने, पंखे आदी सामानांचीही पुरती वाट लागली आहे. वृद्धाश्रमाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने या वृद्धांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. चक्रीवादळाने वृद्धाश्रमाचे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचे संचालकांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

चक्रीवादळाला आठ दिवस उलटून गेले आहेत; पण, वृद्ध अद्यापही छप्पर हरवलेल्या वृद्धाश्रमात अनेक अडचणींचा सामना करीत राहत आहेत. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या शिक्षिका सुमन रणदिवे या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या वृद्धाश्रमाकडे वसईकरांचे लक्ष वेधले गेले. वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी वृद्धाश्रमाची झालेली हानी आणि रणदिवे यांची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी वृद्धाश्रमात स्वतः जाऊन पाहणी केली. सरकारकडून येत्या दोन दिवसात सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे भगत यांनी यावेळी सर्वांना आश्वासित केले.

चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाचे मोठे नुकसान झाले आहे. मी स्वतः वृद्धाश्रमात जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात वृद्धाश्रमाला सरकारी मदत दिली जाईल. – उज्ज्वला भगत, तहसीलदार

उद्धव, राज ठाकरेंच्या शिक्षिकेच्या नशिबी उपेक्षा!
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -