घरमुंबईथेंब थेंब पाण्यासाठी वणवण

थेंब थेंब पाण्यासाठी वणवण

Subscribe

शहापुरात भीषण पाणीटंचाई , 23 गावे 74 आदिवासी पाड्यांसाठी केवळ 17 टँकर

मुंबई ठाणे महानगरांची तहान भागवणार्‍या शहापूर तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. 23 गावे आणि 74 आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई आहे. या भागात फक्त 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. हे पाणी अपुरे असून, थेंब थेंब पाण्यासाठी उन्हाच्या रखरखीत आदिवासी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नदी, नाले, विहिरी आटू लागले आहेत. शहापूरच्या काही गावात आणि आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई आहे. पाण्याच्या शोधासाठी आदिवासी महिलांची भटकंती सुरू झाली आहे. आटलेल्या विहिरीत थेंब थेंब जमा होणारे पाणी गोळा करण्यासाठी रात्री जागून महिला पाणी भरत आहेत, तर काही आदिवासी ओहळांवर खड्डे, डवरे खोदून पिण्यासाठी पाणी शोधत आहेत. खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ आदिवासींवर आली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी 23 गावे व 74 आदिवासी पाडे टंचाईग्रस्त असल्याचा अहवाल तयार केला गेला आहे. यातील टंचाईग्रस्त गावे व पाड्यांकरिता फक्त 17 टँकरची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर टंचाईग्रस्त पाड्यांची आणि गावांची नोंद असताना फक्त 17 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरे पडणार असल्याने इतर गावे आणि पाड्यांचे काय होणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आदिवासींमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहापूर तालुक्यातील कसारा परिसरातील चिंतामणवाडी, नारळवाडी, पारधीवाडी, ओहळाचीवाडी, टोकरवाडी, बिवळवाडी, पायरवाडी, नवीनवाडी, गांडूळवाडी, वाशाळा, माळ, आंबेखोर, कोथळे, तेलमपाडा, ढेंगळमाळ या भागात भीषण पाणीटंचाई आहे.

- Advertisement -

पाणीपुरवठा विभागाच्या 194 पाणी योजनांपैकी अनेक योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. यातील काही योजना निधीअभावी आणि कामातील गैरव्यवहार तसेच त्रुटींमुळे बंद पडून आहेत, तर काही पाणी योजनांची लाखो रुपयांची विज बिले थकल्यामुळे या पाणी योजना बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -