वेस्टर्न इंडिया मिलमची जागा महापालिका म्हाडाला देणार

bmc office
मुंबई महानगरपालिका

मुंबईतील सूत गिरण्या बंद झाल्यानंतर त्याठिकाणी होत असलेल्या पुनर्विकासात म्हाडा आणि महापालिकेला जमिनीचा काही हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार म्हाडाला 6 गिरण्यांच्या जागी म्हाडाला घरांसाठी जागा मिळाली असून उदयानांसाठी महापालिकेला शिवडीतील वेस्टर्न इंडिया मिलच्या जागी एकत्र जागा मिळाली. त्यामुळे म्हाडाच्या ताब्यातील सहा भूखंड महापालिका आपल्या ताब्यात घेऊन आपल्या ताब्यातील एक मोठा भूखंड म्हाडाला देणार आहे. भूखंड हस्तांतरणांची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याकरता शिवडीच्या जागेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय ज्याठिकाणी एकच उद्यान महापलिका विकसित करणार होती, तिथे आता सहा उद्यान महापालिकेला विकसित करता येणार आहे.

मुंबईतील सूत गिरण्यांच्या पुनर्विकास करताना प्रत्येकी एक तृतीयांश जागा मालक, महापालिका आणि म्हाडा यांच्यात विभागणी करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. त्यामुळे मनोरंजन मैदानाचा भाग आणि सार्वजनिक घरे तथा गिरणी कामगारांची घरे यासाठीच्या जागा एकमेकांलगत देण्यात येतात. परंतु हे भू भाग आकाराने लहान असल्याने त्यावर मैदान किंवा घरे बांधण्याचे प्रयोजन पूर्ण होत नाही. त्यामुळे सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील कलाम 58(1)(ब) नुसार सूत गिरण्यांच्या पुनर्विकासांतर्गत म्हाडा प्राधिकरणाला प्राप्त झालेल्या 6 लहान आकाराच्या भूभागांची अदलाबदल करून त्याबदल्यात महापालिकेच्या ताब्यातील एक संपूर्ण भूखंड म्हाडाला गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या ताब्यातील शिवडीतील वेस्टर्न इंडिया लिमिटेड -एम.एस.टी. सी. मिल याची एकूण 3607.83 चौ.मीटर एवढी जागा आहे. तर म्हाडाच्या ताब्यातील सहा भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ 3873.83चौ मीटर एवढे आहे. महापालिकेच्या ताब्यातील भूखंडाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत 265.98 चौ मीटर अधिक आहे. मात्र, गिरणी कामगारांच्या घरासाठी एकत्र भूखंड आवश्यक असल्याने आपला मोठा भूखंड देऊन म्हाडा 265.98 चौ मीटर क्षेत्रफळाची कमी जागा घेणार आहे.
सुधारित सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार म्हाडा आणि माहापलिका यांच्यात सूत गिरण्यांच्या पुनर्विकासात मिळालेल्या भूखंडाची अदलाबदल होणार आहे. यामध्ये सहा मिलमधील जागा मिळणार असून महापालिकेची म्हाडाच्या तुलनेत 265.98 चौ मीटर जागा कमी आहे. तरीही एकही पैसा न देता याची अदलाबदल केली जात आहे. यापूर्वी महापालिकेने भूखंडाची अदलाबदल केलेल्या आहे. इथे तर गिरणी कामगारांच्या घरांसाठी भूखंडाची अदलाबदल होत आहे. त्याबदल्यात महापालिकेला सहा भूखंड मिळत असून एक ऐवजी आता महापालिकेला सहा जागी उद्यान, मनोरंजन मैदान उभारणे शक्य होईल. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत मंजुरीला पाठवला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, असे मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त पराग मसुरकर यांनी स्पष्ट केले.

म्हाडाच्या ताब्यातील महापालिकेला मिळणार्‍या जागा
मफतलाल : 481.43 चौ. मीटर
मातुल्य मिल : 388.30 चौ. मीटर
हिंदुस्थान मिल युनिट अ व ब: 542.10 चौ. मीटर
व्हिक्टोरिया मिल : 850 चौ मीटर
हिंदुस्थान मिल (क्राउन मिल) : 602 .15 चौ मीटर
एम.एस.टी. सी : 1009.83 चौ मीटर