नवरात्रीत कुमारिका पूजन का केलं जातं ?

शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला असून या दिवसात कुमारिका पूजन केले जाते. नवरात्र म्हणजे नवदुर्गापूजन. दुर्गा म्हणजे शक्ती .यामुळे या दिवसात देवीच्या नऊही शक्तींचे पूजन केले जाते. कुमारिकांना देवीचे रुप मानले जात असल्याने नवरात्रीत त्यांचे पूजन करण्याची प्रथा पूर्वापार सुरू आहे.

यावेळी कुमारिकांना पाटावर बसवले जाते. कपाळावर कुंकू लावून त्यांचे पूजन केले जाते. यात प्रामुख्याने दोन वर्षाच्या मुलीपासून दहा वर्षाच्या मुलींचे पूजन केले जाते.

प्रामुख्याने दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. तिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते अशी भाविकांची भावना आहे.

तर तीन वर्षाच्या कन्येत साक्षात त्रिमूर्ती असते. यामुळे तिचे पूजन केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.

चार वर्षाची कन्या भरभराटीचे रुप असते. हिचे पूजन केल्याने घरात सुख समृद्धी येते. ऐश्वर्य प्राप्त होते.

तर पाच वर्षाच्या कन्येला रोहिणीचे रुप मानले जाते. जी रोगराईपासून रक्षण करते.

सहा वर्षाची कन्येला कालिकेचे रूप मानले जाते. तिचे पूजन केल्याने राजयोग, संपत्तीची प्राप्ती होते. अशा आख्यायिका आहेत.

सात वर्षाची कन्या चंडिकाचे रुप असते. तिच्या पूजनामुळे शत्रूचा नाश होतो.

आठ वर्षाची कन्या शांभवी देवीच्या रूपात असते. यामुळे तिची पूजा केल्यास शत्रूवर विजय मिळवता येतो.

तर नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचे रूपात असल्याने ती शत्रूंपासून, वाईट शक्तींपासून बचाव करते.

दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रेचे रूप मानले जाते. जी भक्तांचे सदैव रक्षण करते.

यामुळे नवरात्रीत कुमारिका पूजनाला महत्व असते. देवींच्या शक्तीचेच पूजन असल्याने घराघरात कुमारिका पूजन केले जाते. यावेळी बालिकांना वस्त्रालंकार भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. गोडधोड खाऊ घातले जाते.