घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयात्रोत्सवासाठी लिलाव ७६ प्रत्यक्षात स्टॉल्स शेकडोवर

यात्रोत्सवासाठी लिलाव ७६ प्रत्यक्षात स्टॉल्स शेकडोवर

Subscribe

प्रशांत सूर्यवंशी । नाशिक

कालिका देवीच्या यात्रोत्सवासाठी महापालिकेने अधिकृत ७६ स्टॉल्सचा लिलाव केला असला तरीही प्रत्यक्षात मात्र तब्बल अडीचशेहून अधिक स्टॉल्स दिमाखात उभे आहेत. राजकीय वरदहस्ताखाली दबलेल्या महापालिका प्रशासनाकडून या अतिरिक्त स्टॉल्सवर कारवाई होणे अपेक्षित असताना, कर वसुली आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी मात्र दोन-चार रुपयांवर गुजरान करणार्‍या यात्रेतील लहान-सहान फेरीवाल्यांवर कारवाई करत आपली मर्दुमकी दाखवत आहेत.

- Advertisement -

कालिका यात्रोत्सवापूर्वीच दरवर्षाप्रमाणे महापालिका प्रशासनाने यात्रेतील गाळ्यांचा लिलाव केला. हे करताना महापालिकेच्या संबंधित विभागाने कागदोपत्री अवघे ७६ स्टॉल्सचा लिलाव झाल्याचे दाखवले. प्रत्यक्षात मात्र मुंबई नाका ते गडकरी चौकातील म्हाडा कार्यालयादरम्यान तब्बल शेकडो स्टॉल्स उभे आहेत. सर्वसामान्य नाशिककरांना हे चित्र दिसत असताना महापालिका अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहेत. दुसरीकडे मुंबई नाका भागातील प्रस्थापित पांढरपेशा गुंडांच्या दहशतीमुळे यात्रांमध्ये खेळण्या विकण्यासाठी येणार्‍यांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. हे गुंड त्यांच्या चेल्यांकरवी लहान-लहान फिरत्या विक्रेत्यांना धमकावून हप्ते वसुल करतात. हे प्रकार कमी की काय म्हणून दिवसा महापालिकेच्या कर्मचार्‍यांकडून फिरत्या विक्रेत्यांचा छळ सुरू असतो. यात्रोत्सवाच्या आनंदात या वसुलीभाई आणि पालिकेच्या मनमानीचा धंदा दरवर्षी विस्मरणात जातो. याचाच फायदा तथाकथित प्रस्थापित घेतात. दुर्दैव एवढेच की, यात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात पोलिसही निमूटपणे हे सारे बघत ड्युटी बजावत असतात.

जागेच्या मापात पाप

लिलाव करताना प्रत्येक स्टॉलच्या क्षेत्रफळानुसार भाडे निश्चित केले जाते व त्यानंतर निर्धारित जागेवर स्टॉल्स उभे राहतात. यात्रेतील स्टॉल्सच्या बाबतीत मात्र आधी स्टॉल्स उभे राहिले व त्यानंतर त्याचे मोजमाप झाले. हे मोजमाप करतानाही पालिकेच्या संबंधितांनी मापात पाप केल्याची चर्चा आहे.

- Advertisement -
..तर भिकार्‍यांकडून हे निर्लज्ज हप्ता मागतील

गावोगावच्या यात्रा फिरून पोट भरणारे विक्रेते निदान भीक तर मागत नाहीत, हा विचार हप्ता घेणार्‍यांसह पालिका प्रशासनाने करावा. कर्मचार्‍यांची हापापलेली मनोवृत्ती पाहता हे कर्मचारी उद्या भिकार्‍यांकडूनही हप्ता मागण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. स्वतःचा खिसा भरताना दुसर्‍याच्या पोटावर लाथ मारली जाणार नाही, याचा तरी विचार व्हावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -