मेहेंदी उतरण्यापूर्वीच नववधूने दाखवला ‘रंग’; दागिन्यांसह ऐवज घेऊन पसार

भोर तालुक्यातील निगुडघर गावची घटना चर्चेचा विषय

wedding photo

श्रीगोंदा : तालुक्यातील पेडगावची रहिवासी असलेल्या नववधूने दोन दिवसांतच सासरच्या घरातील दागिने, पैसे, साड्या, कपडे व अन्य ऐवज घेवून पोबारा केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निगुडघर गावी घडली. ही घटना तालुक्यात मोठा चर्चेचा विषय ठरली. या प्रकरणी नवरी मुलीसह मध्यस्थी करणार्‍या पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखला केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवरदेवाचे वडील कैलास लिंभारे (वय ६५ वर्षे, रा. निगडुघर, भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले की, निगुडघर येथील कैलास लिंभारे यांना कापडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथे पुनर्वसनातून मिळालेल्या जमिनीत येणे-जाणे असते. त्यांच्या या जमिनी शेजारी असलेल्या बाबू जाधवला मुलगा दिगंबर याला लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार जाधव याने सुरेश बुधावले (रा. दहीगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याशी ओळख करून दिली.

सुरेश बुधावले याने राजू अवघडे व बापजी चव्हाण यांच्या मदतीने श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील संबंधितांची एक मुलगी लग्नाची असल्याचे सांगितले व १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. मुलाचे लग्न जमणार या हेतूने लिंभारे यांनी पैसे देण्यासाठी सहमती दर्शवली. पेडगाव लांब असल्यामुळे लग्नाच्या तयारीने जाऊन विवाह आटपून परतू, असे सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण यांनी लिंभारे यांना सांगितले.

१ ऑक्टोंबरला निगुडघर येथून नवरा मुलगा दिगंबर लिंभारे याच्यासह ९ जण चारचाकी गाडीने सायंकाळी साडेपाच वाजता पेडगावला आले. नवरा दिगंबर लिंभारे, वडील कैलास लिंभारे, सिंधूबाई लिंभारे, मालन शेडगे, राजेंद्र साळेकर यांच्यासह लग्न जमवणारे बाबू जाधव, सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण आदींचा समावेश होता. विवाहाला येताना दौंडमधून मुलीला २२ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने व श्रीगोंदा शहरातून ३ हजाराच्या साड्या घेतल्या. तसेच, बापजी चव्हाण व राजू अवघडे यांनी कैलास लिंभारे यांच्याकडून ६० हजार रुपये घेतले. पेडगाव येथे लग्न झाल्यावर सायंकाळी साडेसात वाजता नवरी मुलगी सासरच्या लोकांसमवेत रात्रीत निगुडघर येथे आली.

दिनांक ३ ऑक्टोबर, रविवारी कैलास लिंभोरे हे कापडगावला गेले. तेव्हा घरात नवरा मुलगा दिगंबर, त्याची आई अलका, नवविवाहिता होती. दि.४ ऑक्टोबर सोमवारी पहाटे पाच वाजता नवीन नवरी घरातील सोन्या, चांदीचे दागिने, साड्या व ५ हजार रुपये घेऊन पळून गेली.

या घटनेनंतर कैलास लिंभोरे यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नववधूसह बाबू जाधव, सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भोरचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे पुढील तपास करत आहेत. ही संपूर्ण घटना तालुक्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरली.