घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकलिंगडामुळे ‘अच्छे दिन’: 62 दिवसांत कमवले 20 लाख!

कलिंगडामुळे ‘अच्छे दिन’: 62 दिवसांत कमवले 20 लाख!

Subscribe

वीरगाव येथील शेतकर्‍याची यशोगाथा; चार एकरमध्ये कलिंगडाची लागवड

संगमनेर : एकामागून एक संकटांनी शेतकरी पुरते हतबल झालेले असतानाच अवकाळीनेही जोरदार झटका दिला. यामध्ये अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही अकोले तालुक्यातील वीरगाव येथील विश्व हायटेक रोपवाटिकेचे संचालक वीरेंद्र थोरात यांचे वाटेकरी श्याम अस्वले या तरुण शेतकर्‍याने अवघ्या चार एकरवर लावलेल्या कलिंगडातून केवळ 62 दिवसांत खर्च वगळता 20 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.

वीरगाव येथील वीरेंद्र थोरात यांनी विश्व हायटेक नर्सरीच्या माध्यमातून कायमच शेतकर्‍यांना नवनवीन प्रयोग करण्यास मार्गदर्शन केलेले आहे. याचा अनेक शेतकर्‍यांना फायदा झाला असून, यशस्वी उत्पादक झाले आहेत. यापूर्वी ढोबळी मिरची, पपई, टोमॅटो, झेंडू आदी पिकांमध्ये त्यानी दिलेल्या सल्ला व मार्गदर्शनाचा फायदा शेतकर्‍यांना होवून त्यांना शेतीत स्थिरता मिळाली आहे. यामध्ये ते स्वतःही शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी वर्षभरात कमी कालावधीत येणारी पिके घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चार एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरचा वापर करुन वर्षाच्या सुरुवातीला कलिंगडाची लागवड केली. मात्र, टाळेबंदी असल्याने त्यांना नफा चांगला मिळाला नसला तरी सुमारे 150 टनाचे चांगले उत्पादन मिळाले. त्यानंतर झेंडूची लागवड केली. त्यातही 40 टन उत्पादन घेतले.

- Advertisement -

ऑक्टोबर महिन्यात पुन्हा कलिंगडाची त्याच क्षेत्रात लागवड केली. डिसेंबर महिन्यात हे पीक परिपक्व होऊन काढणीला आले. प्रतीएकर 25 टनाप्रमाणे चार एकरमधून 100 टन उत्पादन निघाले. उत्तम गुणवत्ता व दर्जेदार असल्याने भारतातील कलिंगडाचे सर्वात मोठ्या व्यापार्‍याने थेट वीरगावमध्ये येऊन कलिंगड खरेदी केली. एकाच दिवशी शंभर टन माल काढून दिल्लीला नेला. या पिकास प्रतीएकर 80 हजार रुपयांप्रमाणे 3 लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला. व्यापार्याकडून 24 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाल्याने 24 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यातून खर्च वगळता 20 लाख 80 हजार रुपयांचा नफा केवळ दोन महिन्यात मिळाला आहे.

या यशामागे सूक्ष्म व्यवस्थापन, सिंचन, तंत्रज्ञान आणि वातावरणाचा अचूक अंदाज घेत केलेली औषध फवारणी कारणीभूत असल्याचे वीरेंद्र थोरात यांनी सांगितले. याचबरोबर वाटेकरी श्याम अस्वले यांच्यासह कुटुंबियांची अपार मेहनत असल्याचे आवर्जुन सांगितले. अजूनही निर्यातक्षम माल गेला असून, उर्वरित माल शेतातच आहे. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळेल असे सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीमध्ये हतबल न होता नवनवीन प्रयोग करुन तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेतला तर नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -