घरपालघरखाजण जमिनीवरील भरावप्रकरणी गुन्हा दाखल

खाजण जमिनीवरील भरावप्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

मालक नरेश रियावाला, भगवती जैन , देवराज कोठारे यांनी खारभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात दगड माती, डेब्रिज यांचा भराव केला होता. तसेच खारभूमीचा बांध माती भराव करून बंद केला होता.

वसईः वसई पूर्वेकडील ससूनवघर येथील खाजण जमिनीमध्ये मातीचा भराव करून कांदळवनाचे नुकसान केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात नरेश रियावाला, भगवती जैन, जयंत कोठारी यांच्याविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ व १९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससूनवघर येथील खाजण जमिनीवर मातीचा भराव करून नैसर्गिक नाला बुजवण्यात आला होता. तसेच माती भरावामुळे कांदळवनही नष्ट झाले होते. याप्रकरणी ससूनवघर गावातील रहिवासी अनंत कृष्णा पाटील ,ऋषिकेश गंगाधर पाटील, गंगाधर लाडक्या म्हसे ,प्रकाश मदन सांबरे यांनी उपविभागीय अधिकारी वसई यांच्याकडे १४ ऑक्टोबर २०२१ ला तक्रार केली होती. ससूनवघर येथील सर्वे क्रमांक ३२५ जुना व नवीन १७५ येथे जमिनीचे मालक नरेश रियावाला, भगवती जैन , देवराज कोठारे यांनी खारभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात दगड माती, डेब्रिज यांचा भराव केला होता. तसेच खारभूमीचा बांध माती भराव करून बंद केला होता.

त्यामुळे नैसर्गिकरित्या व भरती ओहोटीचे पाणी वाहून जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला होता. माती भराव करताना ३०० ते ४०० तिवरांची खारफुटी झाडे जमिनीत गाठून टाकली होती. असे तत्कालीन तलाठी धर्मा करे पाटील यांनी आपल्या आवारात नमूद केले आहे. त्यांनी आपला अहवाल २० डिसेंबर २०२१ रोजी वसई प्रांताधिकार्‍यांना पाठवला होता. त्यानंतर १७ मे २०२२ रोजी मंडळ अधिकारी कुमार होगाडे यांनी जागेची पाहणी केली तेव्हा त्यात तथ्य आढळून आले होते. तसेच वसई वनपरिक्षेत्र अधिकारी व सातीवली वनपालांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून माती भराव झाल्याचा अहवाल दिला होता. सर्व अहवाल आल्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी १ नोव्हेंबर २०२२ रोजी वसईच्या तहसिलदारांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तहसिलदारांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी कुमार होगाडे यांनी तक्रार दिल्यानंतर वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुंबई -अहमदाबाद महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केला जात आहे. त्यामुळे तिवरांच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर महसूल आणि वनविभाग कागदी घोडे नाचवून वेळ काढत असल्याचे वालीव पोलीस ठाण्यात तब्बल दोन वर्षांनी दाखल झालेल्या गुन्ह्यावरून समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -