घरपालघरडहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Subscribe

मात्र, यंदा सर्व निर्बंध शिथिल करण्यात येऊन मंदिर पुन्हा सुरू झाले असून, मातेच्या दर्शनासाठी भक्त गर्दी करताना दिसत आहेत.

पालघर: जिल्ह्यातील लाखो भक्तांची कुलदैवत असलेल्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भक्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेले दोन वर्षे अगदी साध्या पद्धतीने साजरा होणारा नवरात्रौत्सव यंदा अगदी जल्लोषात साजरा केला जात आहे. सलग दोन वर्ष कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लादलेल्या निर्बंधांमुळे मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही. मात्र, यंदा सर्व निर्बंध शिथिल करण्यात येऊन मंदिर पुन्हा सुरू झाले असून, मातेच्या दर्शनासाठी भक्त गर्दी करताना दिसत आहेत.
सोमवार 26 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी मातेच्या गडावरील व पायथ्याशी असलेल्या मंदिरात परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली आहे. यासाठी सोमवारी सकाळपासून 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर घटस्थापना करून आईची आरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवासाठी मातेच्या मंदिरात सजावट करण्यात आली असून, आईचे सुंदर मनमोहक रुप पाहायला मिळत आहे. तसेच मंदिराच्या आवारातच आई जगदंबेच्या मूर्तीची स्थापना देखील केली जाते. तिथे आई जगदंबेची विधिवत पूजा करून देखणी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना आई जगदंबेच्या दर्शनाचा लाभ देखील घेता येणार आहे. गेले दोन वर्ष मंदिर बंद असल्यामुळे भक्त भाविक,ग्रामस्थ व व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु यावर्षी दरवर्षीप्रमाणे नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पाणी, लाईट, रेलिंग, सुरक्षारक्षक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी होऊ नये ह्यासाठी 10 सुरक्षा रक्षक आणि 6 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच येत्या रविवारी भाविकांच्या गर्दीत लक्षणीय वाढ होण्याची संभावना असून, त्यासाठी अधिकचा बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
– संतोष देशमुख, अध्यक्ष,
महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट (विवळवेढे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -