घरपालघरघातक रसायनाचा वापर करून वृक्ष तोडीचा प्रयत्न; चार आरोपी वनविभागाच्या ताब्यात

घातक रसायनाचा वापर करून वृक्ष तोडीचा प्रयत्न; चार आरोपी वनविभागाच्या ताब्यात

Subscribe

कुडे गावच्या हद्दीतील महामार्गा लगतच्या वृक्षतोडीला स्थानिक ग्रामस्थ आणि वनव्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्याने वनविभागाने वृक्षतोडीला परवानगी नाकारली होती.

कुडे गावच्या हद्दीतील महामार्गा लगतच्या वृक्षतोडीला स्थानिक ग्रामस्थ आणि वनव्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्याने वनविभागाने वृक्षतोडीला परवानगी नाकारली होती. अनेक प्रयत्न करून वनविभागाचा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावरील वृक्षतोड करता येत नसल्याने भूखंड माफियांकडून घातक रसायनाचा वापर करून झाडे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. झाडांना ड्रिल मारून केमिकल टाकण्यात आले आहे. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून बेकायदेशीर वृक्षतोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडे गावातील महामार्गालगतचा वनविभागाचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न स्थानिक दलालांच्या मदतीने भूमाफियांकडून सुरू आहे. रविवारी चार इसमांनी बेकायदेशीरपणे वनविभागाच्या भूखंडावरील झाडांना भोकं पाडून केमिकल टाकले आहे. दिवसा उजेडात झाडे मारण्याचे काम सुरू असताना वनविभागाचे कर्मचाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष गंभीर आहे. वनविभागाचा भूखंड भूमाफियांना कदापि हडप करू देणार नाही.
– बाबुराव भोवर, ग्रामस्थ, कुडे
वनविभागाच्या भूखंडावरील झाडांची कत्तल करण्यासाठी रविवारी सकाळी चार इसम कुडे गावात दाखल झाले होते. त्यांना कुडे गावातील एका स्थानिक व्यक्तीने इलेक्टिक ड्रिल मशीनसह अन्य साहित्य उपलब्ध करून दिले होते. आरोपींनी भूखंडालगतच्या महावितरणच्या वीजवाहिनीवर आकडा टाकून बेकायदेशीर आणलेल्या वीजमिटरला वीज जोडणी करून इलेक्ट्रिक मशीन सुरू केली होती. ड्रिल मशीनच्या सहाय्याने १५ ते २० झाडांना भोक पाडून झाडांच्या खोडात घातक रसायन टाकण्याचे काम सुरू केले होते. भूखंडावर चार इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने दुपारच्या वेळी ग्रामस्थांनी आरोपींना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बेकायदेशीरपणे स्थानिक प्रजातीची झाडे मारण्याचे काम भूमाफियांकडून सुरू असल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चार आरोपींना पकडून चोप दिला. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून ड्रिल मशीन, घातक रसायन आदी साहित्यासह चारही आरोपींना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. अवैध वृक्षतोडप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एक आरोपी फरार असून तपास सुरू असल्याची माहिती दहिसरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे यांनी दिली.

कुडे गावात रविवारी वृक्षतोड करण्यासाठी बेकायदेशीर वीजजोडणी आणि वीजमिटर वापरल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
– अक्षता बारस्कर, अभियंता, महावितरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -